प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी :
( ९८ ५०८ ३० २९० )
सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर लगेचच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेची औपचारिक अधिसूचना जारी केली. त्यांचे संसद सदस्यत्व २३ मार्च पासून रद्द झाल्याचे स्पष्ट केले. त्या विरोधात काँग्रेस व विरोधी पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई लढतील यात शंका नाही.पण या साऱ्या प्रकरणा नंतर एक मुद्दा पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला आहे. तो म्हणजे
भारतीय राजकारण ,समाजकारण,अर्थकारण वास्तवापासून पासून भ्रामकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे.चोविस तास व्यापून राहिलेल्या माध्यमांची त्याला सक्रिय साथ आहे. बातम्या,चर्चा, जाहिराती संवाद ,मुलाखती ,घोषणा अशा सार्यातूनच भ्रम पसरवला जात आहे. सुमार,बेताल, असत्य, ढोंगी,अविवेकी मंडळींची विभूती पूजा सातत्याने करत राहणे आणि विद्वत्तापूर्ण,सैद्धांतिक,सत्य, प्रामाणिक, विवेकी मंडळींना हिणवणे हे अलीकडील लोकभ्रमाचे लक्षण आहे.
भारतीय राजकारणात अलीकडे पक्षीय विचारधारा आणि निष्ठावंत कार्यकर्ते जे करू शकत नाहीत ते काम केंद्रीय सत्तेतून हातात मिळालेल्या संस्थांद्वारे केले जात आहे. ईडीपासून सीबीआय पर्यंतची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत.जोडीला प्रचंड पैसा आहे. साम, दाम,दंड,भेद यांचा मुबलक वापर सुरू आहे हे नाकारता कसे येईल ? काहींन याची खात्री असावी की, केंद्रशक्ती बरोबर सत्ता स्थापन केली तर आपले केलेले सर्व गुन्हे माफ होतील. इडी पासून सीआयडी पर्यंतचे सर्व ससेमिरे थांबले जाऊन पावन करून घेतले जाईल. शिवाय पुढच्या कैक पिढ्यांची लक्ष्मीदर्शनाची सोयही होणार आहे.कारण तशी उदाहरणे स्पष्टपणे समोर आहेत.आम्ही पक्ष बदल केल्याने आता आम्हाला ईडीची भीती नाही,आमच्या कडे स्वच्छतेचे वॉशिंग मशीन आहे,आमच्या पक्षात प्रवेश करा आणि आरोप मुक्त व्हा अशी जाहीर भाषा ऐकायला, वाचायला मिळतात. त्यामुळे आता बरबटलेपणाला स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळणे सहज शक्य आहे.काही पक्ष कार्यालये आता पावनकेंद्रे बनली आहेत.
‘व्यक्तीला धर्म असेल पण राष्ट्राला धर्म असणार नाही ‘ असे सांगणाऱ्या राज्यघटनेची शपथ घेऊन राजकारण करणारे, सभाग्रहात त्याची हमी देणारे जेव्हा विशिष्ट धर्मासाठी एकत्र येतो म्हणतात तेव्हा त्यांनी धर्माच्या व्यापक वास्तवतेपासून पळ काढलेला असतो.किंबहुना धर्मधारणेशी द्रोह केलेला असतो. भारताच्या प्राचीन संस्कृतीला ,धर्माच्या व्यापकपणाला काळे फासलेले असते.अर्थात एक माणुस म्हणून स्वतःचेही तोंड काळे केलेले असते.पण भ्रामक विचार व वास्तव स्वार्थ यांच्याआड ते लपवले जात असते. आम्ही बुद्धिवंत आहोत,आम्ही विचार करू शकतो अशा भ्रमात असणाऱ्यांच्या बुद्धीवर धर्मांध परधर्मद्वेषाची पुटं कधी चढली व त्यातून आपण कसे गंजलो हेही या भ्रामकतेने कळू दिलेले नाही.
एरवीच्या आक्रस्ताळेपणाने संसदेलाच मौनात घालवणे आणि आपल्याला सोयीच्या नाही त्या विषयावर चर्चाच होऊ न देणे हाही लोकभ्रमी प्रकारच आहे. गेल्या काही वर्षात आपण भारत वेगाने आर्थिक प्रगती करतो आहे ,भारताची जगात प्रतिमा उंचावलेली आहे, भारत विश्वगुरू बनतो आहे, नोटाबंदीने काळा पैसा परत येणार आहे ,जीएसटीतून उद्योग आणि व्यापाराला चालना मिळणार आहे, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळणार आहेत ,दहशतवाद संपणार आहे ,गटारीतून गॅस तयार केला जातो व त्यावर वडे तळले जातात,गणपती हे प्लास्टिक सर्जरिचे वा अवयव रोपणाचे पहिले उदाहरण होते,डॉलरच्या तुलनेत रुपया ऐंशीच्या पलीकडे गेला तरी आपण सक्षमच आहोत, यासारखे अनेक भ्रम जोपासले आहेत.
मात्र भारत गेल्या दशकात अतिशय वेगाने कर्जबाजारी होतोय,चीन तर सोडाच पण छोटे देशही भारतावर नजर रोखून वाचाळ प्रवक्त्याना बदलायला लावत आहेत,बेरोजगारीचा दर उच्चांक गाठतो आहे,उद्योग धंदे बंद पडले आहेत,नोटबंदीने अर्थव्यवस्था खड्यात घातली आहे,चोर व दरोडेखोर बँका लुटून देश सोडून पळून जात आहेत, त्यातील फोलपणा लक्षात येऊनही त्याविरुद्ध ब्र काढला जात नाही. याचे कारण या लोकभ्रमाने एक अंधभक्ती संप्रदाय निर्माण केला आहे. त्याचे सारे शहाणपण मेंदू गहाणटाकी परधर्म द्वेषाशी जोडून दिलेले आहे. त्याची विचार करण्याची कुवत इतकी गोठवून टाकलेली आहे की त्याला आपल्याच धर्मातील तळागाळातील अब्जावधी लोकांचें या साऱ्या निर्णयामुळे, व्यवस्थेमुळे हाल हाल होत आहेत हेही कळत नाही.
लोकभ्रम पूर्वीपासून आहेत. पण त्यांचे स्वरूप इतके विखारी व विनाशी नव्हते. आजच्या आधुनिक काळातील लोकभ्रम हे व्यक्ती ,कुटुंब, समाज व राष्ट्र या सर्वच पातळ्यावर विकलांग बनवणारे आहेत. याचे भान सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. आज आपण जात्यात नाही याकडे सुपात असलेल्यांनी दुर्लक्ष केले तर उद्या त्यांचेही दळणकांडण अटळ आहे. समाजाकडे डोळे उघडे ठेवून पाहिले की आपल्याला अनेक प्रकारचे लोकभ्रम दिसतात. जगामधील सर्वच समाजात ते दिसतात. मनाची दुर्बलता हेच या लोकभ्रमाचे मूळ आहे. माणूस विशेषतः संकटकाळी मानसिक तणाव कमी करण्यासाठी या भ्रमाचा आधार घेताना दिसतो.करुणा भाकणे, नामस्मरण करणे, जपजाप्य करणे यांचा संकटाशी काहीही कार्यकारण भाव नसतो. मात्र मनाच्या समृद्धीसाठी हे सारे चाललेले असते.हा सर्व प्रकार म्हणजे लोकभ्रम असतो. माणूस जितका अज्ञानी तेवढा त्याच्यावर लोकभ्रमाचा पगडा जास्त. अलीकडे शिक्षित माणसेही लोकभ्रमात अडकल्याचे अनेकदा दिसते. याचे कारण ती शिकलेली जरुर असतात पण ज्ञानी असतातच अस नाही.ज्ञान आणि शहाणपण या वेगवेगळ्या बाबी आहेत.
प्रत्येक समाजाच्या विशिष्ट संस्कृतीक परंपरा असतात. त्यांना अनुसरून त्या त्या समाजाचे लोकभ्रम तयार होत असतात. ते परंपरेने पुढच्या पिढीत पोहोचवले जातात.मंत्रतंत्र ,मंतरलेले ताईत यासारखे लोकभ्रम समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात. माणसाचे भूतलावरील अस्तित्व संपल्यानंतरही त्याचे आत्मारुपाने अस्तित्व मागे राहते अशी समजूत अनेक धर्मांमध्ये आहे. त्यातूनच भूत,प्रेत ,पिशाच्च वगैरे भ्रामक समजुती रूढ झाल्या. वास्तविक भूत वगैरे कोणीही प्रत्यक्ष पाहिलेले नसते. पण त्याच्या अभासावर सगळे चाललेले असते. मृत्यूनंतरच्या अस्तित्वाच्या सर्वच कल्पनांना विज्ञानाने भोळसट ठरवले आहे. पण माणसाचे मन कमकुवत असते. त्याचा फायदा तांत्रिक, मांत्रिक भगत वगैरे मंडळी घेताना दिसतात. संत ज्ञानेश्वर ,तुकाराम ते संत गाडगेबाबा आदी अनेक संतांनी हे सर्व थोतांड आहे हे वारंवार स्पष्ट केलेले आहे.
शकुन व अपशकुनांचे लोकभ्रमही मोठ्या प्रमाणात आढळतात.मांजर आडवे जाणे ,पाल चूकचुकणे ,विधवा स्त्रीचे दर्शन होणे वगैरे बाबी अशुभ मानल्या गेल्या.तर सकाळी कोल्हा दिसणे ,स्त्रीचा उजवा डोळा लवणे, सुवासिनी पाण्याची घागर घेतलेली दिसणे वगैरे बाबी शुभ मानल्या आहेत. वास्तविक या घटनांचा एखादे काम होण्याशी अथवा न होण्याची काहीही संबंध नाही .पण तरीही या लोक भ्रमावरील श्रद्धा कमी होत नाही. फलज्योतिष, जन्मपत्रिका, मुहूर्त, मंगळाचे प्रबल्य ,चंद्र सूर्याची ग्रहणे ,उल्कापात यासारख्या अनेक शुभाशु लोकभ्रमांच्या गोष्टी आपल्याला सांगता येईल.माणसाच्या जीवनात अनेकदा संकटे उद्भवतात. अशा वेळी त्याला काहीतरी आधार हवा असतो. नवस बोलणे हा त्यासाठीचाच एक लोक भ्रम आहे. एखाद्या विशिष्ट दैवताला साकडे घालणे ,अभिषेक करणे अथवा विशिष्ट दुःखाचे निवारण केल्यास मंदिराला कळस चढवण्यासारखा नवस बोलणे यांचा आणि प्रत्यक्ष दुःख निवारणाचा काहीही संबंध नसतो. त्यासाठी वैद्यकीय उपचार अथवा तसे उपायच आवश्यक असतात.वास्तविक कोणत्याही घटनेमागील कार्यकारणभाव समजून घेऊन तर्कशुद्ध विचार आणि योग्य उपाययोजना करणे ही शास्त्रीयदृष्टी असते. पण अशा पद्धतीत लोकभ्रमाला अवसरच नसतो. मानवी मनातील अज्ञानजन्य भीती पूर्णतः अजूनही गेलेली नाही. म्हणूनच आजही अनेक लोकभ्रम सुशिक्षित समाजातही प्रचलित असताना दिसतात. मानवी मनातील अज्ञानजन्य भीती जेव्हा जाईल तेव्हाच लोकभ्रम कमी होतील.एकूण काय तर आपण ज्या भ्रमजालात अडकले आहोत,किंबहुना आपल्याला त्यात अडकवले आहे,त्यातून आपली सुटका आपणच करून घेतली पाहिजे.आपली अधोगती टाळण्यासाठी भ्रमाची अंधभक्ती सोडून देऊन वास्तवावर डोळस विश्वास ठेवला पाहिजे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनीचे ‘सरचिटणीस ‘ आणि गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)