सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीच आता "आत्मपरीक्षण" करण्याची वेळ
प्रेस मीडिया लाईव्ह :
:वास्तव आणि रोखठोक: संजय सुतार, नांदणी, तालुका शिरोळ. मोबाईल: 8600857207, 9175792779
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आतापर्यंत आपल्या घरावर "तुळशीपत्र" ठेवून, एकमेकांच्या "खांद्याला खांदा" लावून काम केले आहे. महापुरुषांचे विचार घेऊन अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे यशस्वी केली आहेत. कोणत्याही सामाजिक प्रश्नावर हाक मारल्यानंतर तासाभरात हजर होऊन शेकडो कार्यकर्ते सामुदायिकरित्या त्या प्रश्नाला भिडायचे आणि यशस्वी व्हायचे, ही आतापर्यंतची भूमिका सर्वांनीच अनुभवली आहे. असे असताना जयसिंगपूर (तालुका शिरोळ) येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा या "एकाच" मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अचानक फूट कशी पडली? आणि त्यांची मने अचानक कोसोमिल दूर कशी गेली? यामागे कोणाचे षडयंत्र तर नाही? कोणी जाणूनबुजून स्वतःच्या फायद्यासाठी, राजकारणासाठी आणि आपले बस्तान बसविण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा प्रश्नांवर आपली "पोळी" भाजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते निश्चितच सामाजिक चळवळीची "आत्महत्या" असणार आहे. याचे आत्मचिंतन सध्या करणे गरजेचे आहे.
एकमेकांच्या हातात हात घालून काम करणारे कार्यकर्ते जर एकमेकांच्यावर "त्यांचे सामाजिक योगदान काय याचे आत्मचिंतन त्यांनी करावे" असे आरोप करीत असतील तर आरोप करणाऱ्यांचेही सामाजिक योगदान काय होते? आहेत आणि असणार? हेही निश्चितच पहावे लागेल. दलित, बहुजन, मागासवर्गीय, वंचित, कष्टकरी समाजात काम करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्येच जर दुफळी असेल, उभी फूट असेल तर आगामी काळात दलित, मागासवर्गीय, वंचित घटकावर होणाऱ्या आंदोलनात एकमेकांवर आरोप करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांचे "योगदान" गृहीत धरताच कामा नये. अशी वेळ तालुक्यातील जनतेवर येऊ नये यासाठी सर्वांनीच "आत्मपरीक्षण" करणे गरजेचे आहे.
समाजातील स्वयंघोषित कार्यकर्ते, आपली दुकानदारी सुरू ठेवण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते, कुणाची तरी मर्जी सांभाळणारे कार्यकर्ते, सुपारी बहाद्दर कार्यकर्ते, दिशाभूल करणारे कार्यकर्ते, ढोंगी कार्यकर्ते, समाजात दुफळी निर्माण करणारे कार्यकर्ते, आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवणारे कार्यकर्ते, खोटे व बिनबुडाचे आरोप करणारे कार्यकर्ते, निवडणूक काळात 'विकले' जाणारे कार्यकर्ते, भीती घालून 'लुटणारे' कार्यकर्ते, पैसे घेऊन 'पाठिंबा' देणारे, पैसे घेऊन 'पोबारा' करणारे कार्यकर्ते, मिरवणारे कार्यकर्ते, पक्ष संघटना फोडणारे कार्यकर्ते, काम करतो म्हणून सांगून लुबाडणूक करणारे कार्यकर्ते असे कितीतरी "स्पेशालिटी" असणारे कार्यकर्ते समाजात आज ताठ मानेने फिरताना दिसतात.
पण याला कित्येक जण अपवादही आहेत. आपल्या समाजासाठी असो अथवा कोणाच्या न्याय हक्कांसाठी लढणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे प्रामाणिक कार्यकर्तेही आपण पाहतो. त्यांचा आदर्श आपण समाजासाठी मांडत असतो. अशावेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांचा, वरील कार्यकर्त्यांसमोर टिकाव कसा लागणार? हा फार मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
आज सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे, आजपर्यंत एकत्र काम करणारे कार्यकर्ते आज एकमेकांसमोर आले तरी दुसरीकडे मान फिरवीत आहेत, बोलणे टाळत आहेत, संवाद तर दूरच राहिला आहे, इतकी कटुता त्यांच्यामध्ये आल्याचे दिसते. एकमेकांचे "कुटाळ" काढण्यात आणि एकमेकांना "खाली" खेचण्यातील "चढाओढ" पहावयास मिळत आहे. पण त्यांनी एकमेकांचे "कुटाळ" काढण्यापेक्षा एकमेकांनी आपला "सुकाळ" आठवावा असे निश्चितच वाटते. पुतळा प्रश्नावरून आज एकमेकांना "जशास तसे उत्तर" देण्याची भाषा करण्यात येत आहे. तसेच समाजाची "दिशाभूल" करणाऱ्या आणि "ढोंगी" कार्यकर्त्यापासून समाज बांधवांनी सावध राहावे असे आवाहनही "मोठ्या मनाने" करण्यात येत आहे. 'जशास तसे उत्तर देणार म्हणजे नेमके काय करणार?' याचा खुलासा झाला तर ते इतरांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरले असते. इतक्या "टोकाची" भूमिका केवळ महिनाभरात घडलेल्या घडामोडी वरून येत असेल तर त्यांच्या अंतरंगामध्ये काय "शिजत" असेल हेही तपासावे लागणार आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय आहे? किंवा यामागे कोणती "मोठी शक्ती" काम करीत आहे ? असा प्रश्न माझ्यासारख्या जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. एकमेकांबद्दलच्या "संशयाची सुई" एकमेकांना "टोचत" आहे याचे भान मात्र कोणालाच नाही असे दिसते आहे.
आगामी काळात वंचित, बहुजन, मागासवर्गीय, दलित, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय झाला तर कोणाकडे दाद मागावयाचे? कोणत्या सामाजिक कार्यकर्त्याकडे आपण जावे ? याचा शंभर वेळा विचार अन्यायग्रस्त व्यक्ती निश्चितच करणार यात शंकाच नाही. आपल्याला न्याय मिळेल याची शाश्वती त्याला असणार नाही. अशावेळी याला "अपयश" म्हणायचे की स्वतःच्या पायावर "कुऱ्हाड" मारून घेतले असे म्हणायचे हेही सामाजिक कार्यकर्त्यांनी ठरवणे गरजेचे बनले आहे.
आम्ही घेतलेली भूमिकाच "योग्य" आहे आणि विरोधकांनी घेतलेली भूमिका निव्वळ लोकांची "दिशाभूल" करून स्वतःची "भाकरी" भाजून घेण्यासाठी आहे अशी जर ठाम "समजूत" एकमेकांनी करून घेतली असेल तर हे चळवळीसाठी "धोक्याची घंटा" ठरू शकते. दोन्हीही गटांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंगपूरच्या क्रांती चौकातच बसवावा असे वाटत असेल तर, गावागावात बैठका, मीटिंग घेण्यापेक्षा आपल्या गावातच असणाऱ्या पण आता "विरोधक" समजणाऱ्या आपल्याच समाज बांधवांशी एकाच ठिकाणी बसून चर्चा करण्यात कोणता "कमीपणा" एकमेकांना वाटतो आहे?
जर आपण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा थोर महापुरुषांचे विचार घेऊन "लढण्याची" भूमिका आपल्या हयातीत घेतली असेल, त्यांच्या "विचारावर" चालण्याची "प्रतिज्ञा" केली असेल तर त्यांच्या पुतळ्यांसाठी आपण एकमेकांवर "धावून" जाण्याची "वल्गना" करण्यात काय अर्थ आहे ? महापुरुषांचे विचार हे केवळ "पुस्तकी" ठेवून मोठमोठ्या भाषणात लोकांना सांगण्यासाठी नाहीत, तर ते स्वतः आत्मसात करून त्याप्रमाणे वागण्यासाठी आहेत, याचे भान आपणाला कधी येणार आहे?
आपल्यातच असणाऱ्या "शकुनी" मामांच्यामुळेच महापुरुषांच्या नावाने आतापर्यंत जातीय दंगली घडविण्यात राजकारण्यांना आणि समाज विघातक शक्तींना यश आले आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजा समाजामध्ये, जाती, धर्मामध्ये भांडणे लावण्याचा उद्योग झाल्याच्या कित्येक घटना आपण पाहतो आहोत, त्याच्यावर नुसत्या चर्चाच करीत आहोत. पण त्यातून काही शिकून "शहाणे" होण्याचे जाणूनबुजून टाळत आहोत. कोणालातरी "खुश" करण्यासाठी, कोणाचीतरी "मर्जी" राखण्यासाठी आणि मिळणाऱ्या एखाद्या "तुकड्यासाठी" आपल्याच घरामध्ये, आपल्याच कुटुंबामध्ये आपण जर भांडत असू तर आपला "विनाश" व्हायला वेळ लागणार नाही.
पुतळ्यासाठी जागा जर निश्चित झाली असेल आणि त्याप्रमाणे काम सुरू झाले असेल तर ही गोष्ट आंदोलकांसमोर का मांडली जात नाही आहे? "भूमिपूजन" करण्याची एवढी "घाई" कशासाठी केली जात आहे? "मुहूर्त" काढला असेल तर जनतेला का "कळविले" जात नाही? असेही सवाल उपस्थित होत आहेत. पुतळा व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे तर सर्वांनी मिळून करण्यात कोणती "अडचण" आहे? दोन्ही गटांनी आपल्याला मिळणाऱ्या पाठींब्याचे ठराव, अभिनंदनाचे ठराव करून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखे, स्वतःलाच शाबासकी देण्यासारखे आहे. आपले "कौतुक" लोकांनी केले पाहिजे, लोकांनी "शाबासकी" दिली पाहिजे, ही भूमिका घेऊनच पुतळा प्रश्न सोडवायला पाहिजे. एकमेकांना "आव्हान" देऊन आणि "माथी भडकावून" घेऊन "चळवळीचे नुकसान" केले जाऊ नये असे एक कार्यकर्ता म्हणून वाटते. या प्रश्नावर जर तोडगा निघाला नाही तर आपल्याला आमची पिढी माफ करणार नाहीच आणि आपणही चळवळी साठी "लायक" नाही हे समजून घेणे उचित ठरेल.
कोणाला या प्रश्नाचा फायदा घेऊन ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, तालुका पंचायत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार व्हायचे असेल किंवा एखाद्या समितीचा, महामंडळाचा सदस्य, अध्यक्ष व्हायचे असेल तर त्यांनी खुशाल व्हावे. पण सामाजिक प्रश्नावर लढणाऱ्या सर्व सामाजिक संस्था, संघटना यांना "वेठीस" धरू नये. सामाजिक चळवळी आहेत म्हणूनच नेत्यांना, राजकारण्यांना आणि प्रशासकीय अधिकारी यांना महत्त्व आहे. जर प्रश्न कोणी मांडणारे नसतील तर नेते म्हणवून घेण्यात काहीच अर्थ नाही. ही लढाई "श्रेयवादा"चीही कोणी करू नये. माझ्या मुळे झाले ही भावना देखील नको आहे. ज्यांना राजकारणात "करिअर" करायचे आहे त्यांनी या प्रश्नाचे "भांडवल" करू नये आणि यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक चळवळ "मोडीत" काढू नये इतकीच "माफक अपेक्षा" करावीशी वाटते.