मुठभरांचे भरण पोषण आणि करोडोंचे शोषण योग्य नाही..प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

रामानंदनगर ता.५ सत्तेच्या मर्जीतील मुठभरांचे भरण पोषण आणि करोडो सर्वसामान्यांचे शोषण करणाऱ्या राजकीय धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक मोठी हानी होऊ शकते.आजच्या असमान धोरणांची भविष्यात जबर किंमत देशाच्या एकूण स्वास्थ्याबाबत मोजावी लागेलं.  हे टाळायचे असेल तर खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित करणारी,विषमताचा दाह कमी करणारी धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करावी लागेल. एकीकडे अनैसर्गिक व अनैतिक पद्धतीने  एक - दोन भांडवलदारांची संपत्ती वाढताना दिसत आहे. दुसरीकडे गेल्या एका वर्षात तब्बल सव्वा दोन लाख कोट्याधिशानी या देशाचे नागरिकत्व सोडून परदेशात प्रस्थान केले आहे. तिसरीकडे गेल्या काही वर्षात इथल्या बँकिंग व्यवस्थेला अब्जावधी रुपयांचा चुना लावून काहीजणांनी परदेशी पलायन केले आहे. आणि चौथीकडे सर्वसामान्य जनता महागाई पासून बेरोजगारी पर्यंतच्या अत्यंत महत्त्वाच्या समस्यांनी त्रस्त आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये लोककल्याण हे सर्व महत्त्वाचे मूल्य आहे याचे भान राज्यकर्त्यांनी सोडल्याचे हे निदर्शक आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी , व्ही. वाय .पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आणि परिवर्तनवादी संघटना (ता.पलूस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "आचार्य शांतारामबापू गरुड व्याख्यानमालेत " पहिले पुष्प गुंफताना बोलत होते .'हे स्वातंत्र्य सर्वसमावेशक की मुठभराची मक्तेदारी ' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्याख्यानमालेचे हे अकरावे वर्ष आहे. कालवश आचार्य शांताराम गरुड ,प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि शहीद गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते.प्रारंभी आचार्य शांताराम गरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक आदम पठाण यांनी केले. यावेळी मंचावर सरपंच जयश्रीताई मदने,व्ही. वाय.पाटील, डॉ. अमोल पवार, गणपतराव सावंत, मारूतराव शिरतोडे ,महादेव फाटक गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीस ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्ते शहाजीराव चव्हाण,श्रीमती घाटगे,श्रीमती सदामते यांना आदरांजली वाहण्यात आली.तसेच  सरपंच जयश्रीताई दीपक मदने,एन.जे.पाटील, टी.जी. अनुगडे ,हंबीरराव मोरे, महंमद सैदापुरे,दत्ता मानुगडे,विशाल शिरतोडे,रोहित धायगुडे आदींचा विविध क्षेत्रात यश प्राप्तीबद्दल सत्कार करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये जागतिक पातळीवरचे काही अहवाल, सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय,सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंतच्या काही स्वायत्त संस्थांचे अलीकडील निकाल, तमिळ कवियित्री सुकीर्थराणी ते विधीज्ञ कपिल सिब्बल, निरनिराळे प्रचारात आणले गेलेले शब्द आणि त्याचा अन्वयार्थ, लादलेले निर्णय आणि त्याचे नाकारलेले उत्तरदायित्व, भारतीय राज्यघटनेतील लोकशाही पासून समाजवादापर्यंतचा विचार आणि त्याचे महत्त्व अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत या विषयाची सखोल मांडणी केली. 

यावेळी डॉ.अमोल पवार म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हे स्वातंत्र्य खरच सर्वसमावेशक आहे असे म्हणता येत नाही कारण येथे मुठभराना सर्व प्रकारच्या सवलती अनिर्बंध पद्धतीने दिला जातात.तर विरोधकांना अतिशय विकृत पद्धतीने वागवून स्वायत्त सरकारी संस्थांचा दमनकारी पद्धतीने वापर केला जातो. आपल्या पक्षात प्रवेश केला की कोणालाही पावन करून घेतले जाते. या साऱ्यामुळे हे स्वातंत्र्य मूठभरांची मिरासदारी बनली आहे. यातील धोका ओळखून लोकशाही प्रेमी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी उत्तम सदामते ,बाळासाहेब नदाफ,हिम्मतराव मलमे, प्राचार्य तानाजीराव चव्हाण, रामचंद्र लाड ,डॉ.सुशील गोतपगार, आनंदा सगरे, सिराज पिरजादे, शिवाजीराव इंगळे, दीपक मदने, विलास सुतार आदी मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती होती . प्रा. रवींद्र येवले यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post