कच्चा माल तुटला, भट्ट्या कोलमडल्या,
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
गेले काही दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच आज मंगळवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे दोन तीन तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे वीटभट्टी चालकांना डोक्याला हात लावण्याची वेळ आणली आहे. पावसामुळे वीटभट्ट्टीवरील कच्चा माल तुटून पडला आहे. तर लावलेल्या भट्ट्या कोलमडल्या आहेत. दरम्यान एकीकडे रॉयल्टीसाठी शासन तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक मातीवीट व्यवसाय संकटात सापडलेला होता. तर आता अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे केले आहे. यामुळे केवळ कर्जत तालुक्यातील वीटभट्टी चालकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नवीन घर घेणं असो कि ती उभं करणं त्यासाठी विटांची महत्वाची भूमिका असते. विटांशिवाय घराच्या भिंती उभ्या राहत नाहीत. वीट निर्मितीसाठी आजही पारंपारिक पद्धत वापरली जाते. कच्ची मातीची साच्यात बनवलेली वित्त दगडी कोळशाची भट्टी लावून भाजली जाते. त्यानंतर भट्टीतून टणक बनलेली वीट बांधकामासाठी वापरली जाते. अशात गेले काही दिवस हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आले होते. एक दोनदा रिमझिम पडलेल्या पाऊसानंतर पाऊस पडेल असे चित्र नसले वीटभट्टी चालक, शेतकरी सगळेच धास्तावलेले होते. त्यातच आज दिनांक २१ मार्च रोजी सकाळीच पावसाने तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे कुणाला काही हालचाल करण्याच्या अगोदर अवकाळी पावसाने वीटभट्टी चालकांना मोठा धक्का दिला. तालुक्यात ५०० च्यावर असलेल्या वीटभट्टींवर पावसाने अवकृपा केली आहे. त्यामुळे वीटभट्टी मजुरांनी बनवून वाळवायला ठेवलेला कच्चा माल तुटून पडला आहे. तर उघडा असलेला कोळसा भिजला आहे. त्याचबरोबर लावलेल्या भट्ट्या देखील काही ठिकाणी कोलमडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात सर्व वीटभट्टी चालकांचे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने या अवकाळी संकटाचा सामना कसा करायचा असा प्रश्न वीटभट्टी चालकांसमोर उभा राहील आहे.
घरांच्या भिंतींसाठी वीट लागतेच मात्र या क्षेत्रातही आता काळानुरूप बदल झाला आहे. आता सिमेंट आणि ग्रीट तत्सम मिश्रणातून सिमेंट ब्लॉक बाजारात आले आहेत. हे ब्लॉक हलके असून माती विटेच्या तुलनेत किमतीला परवडणारे आहेत त्यामुळे विटेला दुय्यम स्थान मिळत असल्याचे वीटभट्टी चालक सांगत आहेत. तर दुसरीकडे शासनाकडून रॉयल्टीसाठी कायम तगादा असतो. त्यामुळे रॉयल्टी भारावीच लागते. मात्र नुकसान झाल्यावर शासन अजिबात लक्ष देत नसल्यची खंत वीटभट्टी चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
पावसाच्या भीतीने काही ठिकाणी वीटभट्टी चालकांनी भट्टीवर प्लस्टिक आवरण टाकून झाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र तायतही नुकसानीपासून सुटका झालेली नाही.
माझ्या भट्टीवर किमान २५ हजार कच्ची वीट तुटून पडली आहे. कोळसा भिजला आहे. मात्र हे नुकसान माझे मलाच सहन करायचे आहे. कारण शासन फक्त रॉयल्टी बघते. वीटभट्टी चालकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई शासन देत नसते त्यामुळे तालुक्यातील वीटभट्टी चालकांवर मोठे संकट कोसळले आहे.
: जगदीश पेरणे, वीटभट्टी चालक नेरळ धामोते
तालुक्यात ५०० च्यवर वीटभट्टी चालक, मालक आहेत. अवकाळी संकटाने सगळ्यांनाच बेजार केले आहे. पावसाने वीटभट्टी चालकांना जेरीस आणले आहे. अनेकांनी सोने, दागिने गहाण ठेऊन कच्चा माल आणि वीटभट्टीसाठी भांडवल उभे केले होते. मात्र या पावसाने सगळ्याची माती केली आहे. तुटलेला माल परत वापरात येणे अशक्य आहे. तर दुसरीकडे वीटभट्टीसाठी नुकसान भरपाई शासन देत नाही मात्र रॉयल्टीसाठी तगादा लावून ती वसूल केली जाते. अवकाळी पावसाने वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे एकूण नुकसान केले आहे. त्यामुळे शासनाने वीटभट्टी मालकांकडे आता खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे.
: सुनील घोडविंदे, अध्यक्ष बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स संघटना, कर्जत