प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्ग 504 अ चे काम अनेक भागात अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वसाठी कशेळे ग्रुप सरपंच हर्षला राणे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ यांना स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
कर्जत कशेळे मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले चार वर्ष संथगतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. तर अनेक ठिकाणी रस्ता खचला असून असलेली अर्धवट कामे यांमुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा देण्यात आलेला हा रस्ता अखेर पूर्ण होणार की नाही? असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे.
रस्त्यांवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून उदासीन भूमिका घेतलेली दिसत आहे. त्यामुळे कशेळे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच राणे यांनी महामंडळास निवेदन देवून रस्त्यावरील अर्धवट असलेली कामे लवकर पूर्ण करा असे आवाहन केले आहे. दरम्यान, सदरचे रस्त्याचे अर्धवट असलेले बांधकाम एक महिन्यात काम पूर्ण करावे. त्याचवेळी कशेळे रस्ता,पेजनदी पूल आणि दोन्ही बाजूचे रस्ते तसेच टाकवे पूल दुरुस्तीची ही कामे त्वरित करावीत. अन्यथा कशेळे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशी 10 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर कशेळे येथे रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा सरपंच राणे यांनी दिला आहे. कशेळे ग्रामपंचायत कडून देण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलन बद्दल राज्य रस्ते विकास महामंडळ कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.