प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
नैना प्रकल्पाला विरोध करत रायगडमधील २३ गावांतील ग्रामस्थांनी गुरुवारी लाँग मार्च काढत सिडकोवर धडक दिली. नैना प्रकल्पबाधीत शेतकरी उत्कर्ष समितीच्या बॅनरखाली महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होऊन काही काळ वाहतूककोंडी झाली.
नैनाच्या पहिल्या टप्यात रायगड जिल्ह्यातील २३ गावांचा समावेश करून सिडकोच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्ट उभारला जात आहे. मात्र, येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा नैनाला विरोध आहे. त्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून विविध स्तरावर आंदोलने केली जात
आहे. २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रत्येक गावात एक दिवस बंद पाळण्यात आला. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात नैना हटविण्याबाबत काही तरी निर्णय होईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र यासंदर्भात काहीच निर्णय न झाल्याने नैना प्रकल्पबाधीत उत्कर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी पनवेल ते बेलापूर येथील सिडकोभवनपर्यंत निषेध रॅली काढली. यावेळी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांना नैना प्रकल्प रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
या शिष्टमंडळात माजी आमदार बाळाराम पाटील, अॅड. सुरेश ठाकूर, वामन शेळके, राजेश केणी, बबन पाटील, सुदाम पाटील, अनिल ढवळे आदींचा समावेश होता.