प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पेण जवळील आंबिवली फाट्यानजीक काल (ता. 13) पहाटेच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी दापोलीवरून मुंबईकडे जाणाऱ्या एका कुटुंबियांच्या गाडीवर दगड मारून त्यांची गाडी अडवून त्यांच्याबरोबर झटापट करीत त्यांच्याकडील जवळपास 15 तोळे सोने लुटण्याची घटना घडली होती.
याप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी आरोपी सुरेंद्र भगवानराम बिश्नोई (वय 21), पूनमचंद किसन बिश्नोई (वय 23), कुणाल दिलीप देवरे (वय 24), प्रभाकर हरी उलवेकर (वय 43) श्रीचन्द किसनराम बिश्नोई (वय 31), शामसुंदर भगीरथराम बिश्नोई (वय 29) यांना अटक केली आहे.
यातील प्रभाकर हरी उलवेकर याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला उपचारांकरिता पेण येथील म्हात्रे हॉस्पिटल येथे दाखल केले होते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून जीप क्र. एमएच 06 एझेड 1451 मधून एका कुटुंबातील 6 जण दापोलीवरून बोरिवली मुंबईकडे प्रवास करत होते. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन आंबिवली फाट्यानजीक हॉटेल साई सहारा येथे आले.
त्यावेळी एका कारमधून आलेल्या तरुणांनी त्यांच्या जीपच्या काचेवर दगड मारून शिवीगाळ केली. घाबरलेल्या चालकाने गाडी पुढे नेली असता समोरून तीन वाहनांतून आलेल्या जवळपास 12 ते 15 तरुणांनी त्यांना अडवून मारझोड केली.
शिवीगाळ करून जीपमधील प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने खेचून पळ काढला होता. जीपमधील घाबरलेल्या प्रवाशांनी पनवेल गाठत स्थानिक पोलिसांना घडलेली हकिगत सांगितली. याप्रकरणी पेण दादर सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती