माळरानावर फुलवली फळबाग, पाणीटंचाईवर देखील केली मात, ओलमन येथील आदिवासी शेतकरी प्रभाकर पादीर यांची आदर्शवत फळबाग




प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

    कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. याचे कारण तालुक्यात आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. तर या भागात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. अशात याच पाणी टंचाईवर मात करत तालुक्यातील ओलमन येथील आदिवासी शेतकरी प्रभाकर रामचंद्र पादीर यांनी चक्क माळरानावर फळबाग फुलवली आहे. तर या फळझाडांसाठी पाण्याचे नियोजन म्हणून त्यांनी प्लास्टिक बाटल्यांचा वापर केला आहे. त्यामुळे माणसाने मनात आणलं आणि त्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर काहीही करू शकतो हे पादीर यांनी दाखवून दिले आहे. 

                भाताचे कोठार असा कर्जत तालुक्याचा लौकिक होता. मात्र आता शेतीसाठी खर्च अधिक आणि तोटा जास्त, विभक्त कुटुंब पद्धती, त्यात मजूर मिळत नाहीत, खत, बियाणे यांवर होणारा अफाट खर्च त्यात शासनाकडून मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेती करणे परवडणारे राहिले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात तालुक्यात हजारो एकर शेती बिनशेतीमध्ये रूपांतरित झाली आहे. तर याच शेतीवर गृहप्रकल्प, व फार्महाऊसेस उभे राहत आहेत. मात्र दुसरीकडे वडिलोपार्जित शेती संभाळण्यावर आजही काही शेतकरी भर देत असल्याचं सकारात्मक चित्र आहे. तालुक्यातील ठाणे जिल्ह्याच्या हद्दीजवळ असलेला ओलमन गाव हे मोजक्याच घरांची वस्ती असलेले गाव. याच गावातील प्रभाकर रामचंद्र पादीर यांची गावाच्या खालच्या भागात १२ एकर माळवरकस शेती आहे. वडिलोपार्जित शेती असून देखील पादीर यांनी ती शेती आजही सांभाळून ठेवली आहे. तर या शेतीत काहीतरी करायचे असा त्यांनी काही वर्षांपूर्वी विचार केला. मात्र  माळवरकस असल्याने कशाला काही करायचे असे अनेकांनी त्यांना समजावले पण पादीर यांचा निश्चय दृढ होता. त्यामुळे सुरवातीला त्यांनी तिथे साफसफाई करून काही आंब्यांची कलमे लावली. त्यानंतर दोन वर्षे ती जगल्यावर त्यांनी जवळील प्रकृती संस्थेला त्यांनी भेट देऊन त्यांच्याकडून मदत घेतली.आणि मागील पावसाळ्यात २०० पपई व १६० आंब्यांची रोपे त्यांनी आपल्या दोन एकर शेतात लागवड केली. हि रोपे देखील प्रकृती संस्थेने त्यांना दिली. तर यानंतर मोठे संकट होते ते पाण्याचे ! हि गोष्ट प्रभाकर यांच्या लक्षात होती. म्हणून त्यांनी आपल्या जागेत एक शेततळे निर्माण केले. तर पाऊस सरल्यावर समोरून जाणाऱ्या नाल्यातील पाणी पंपाच्या साहाय्याने आपल्या शेतातील तळ्यात साठवून ठेवले. 

                पंपाने पाणी झाडांपर्यंत नेले तर त्यात पाण्याची कमतरता निर्माण होणार याची कल्पना पादीर यांना होती. त्यामुळे त्यांनी यावर नामी युक्ती शोधून काढली. प्रकृती संस्थेला भेटून त्यांनी त्यांच्याकडून प्लॅस्टिकच्या बाटल्या घेतल्या. साधारण २ लिटर क्षमता असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्याना झाकणाजवळ छिद्रे केली. आणि त्या बाटल्या प्रत्येक झाडाजवळ दोन अशा करून लावल्या. तर या बाटल्यांच्या मागील बाजू पाणी भरण्यासाठी  पूर्णपणे खुल्या करण्यात आल्या. आता याच बाटल्यांमध्ये ते बादली व मगाच्या साहाय्याने पाणी भरतात आणि पूर्ण दिवसत्यातले हवे तेवढे पाणी झाडाला वापरले जाते. तसेच आपल्या शेतीतील झाडांना लगडलेली फळे हि रुचकर असायला हवीत यासाठी प्रभाकर पादीर यांनी जीवामृत, शेणखत आदी खते शेतातच बनवून झाडांना त्याची मात्रा दिली आहे. त्यामुळे शून्य खर्चात जास्त उत्पादन व रासायनिक खतमुक्त फळांचे उत्पादन त्याना मिळणार आहे.  प्रभाकर पादीर यांना या कामात त्यांची पत्नी चांगुणा पादीर सुद्धा मदत करतात. पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे आता पपईच्या झाडांना फळे लगडली आहेत. तर ३ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या आंब्यांच्या झाडांपासून त्यांना मागील वर्षी ५ क्विंटल आंब्यांचे उत्पादन मिळाले. यंदा आंब्यांच्या झाडांना देखील मोहर चांगला आला असून आंबे आणि पपई अशी दोन्ही झाडांचे चांगले उत्पादन त्यांना मिळेल अशी आशा आहे. तर प्रभाकर पादीर यांची हि शेती सगळ्या शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरत आहे. 

       माणसाने ठरवलं तर त्याला काहीही अशक्य नाही. शेती हि आपली आई आहे. तिच्यात घाम गाळला तर कातळ असलेल्या भागात सुद्धा पीक बहरते. मी विचार केला होता त्याला प्रकृती संस्थेची साथ मिळाली त्यामुळे आज २ एकरावर माझी शेती बहरली आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळाले तर हीच शेती अजून वाढवण्याचा माझा मानस आहे. 

: प्रभाकर रामचंद्र पादीर, आदिवासी शेतकरी ओलमन

Post a Comment

Previous Post Next Post