खालापूर - कर्जत तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात अखेर पत्रकार राजेंद्र जाधव यांचे आमरण उपोषण सुरू

 तहसील व प्रातांधिकारी यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

महसूल विभागातील लाचखोर, भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे. या भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून मागील २-३ वर्षात झालेल्या अवैध उत्खनन व भराव याचा जागेवर जावून पंचनामा करून रॉयल्टी बुडविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी मंगळवार, दि. २८ मार्च २०२३ पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले असून यानंतरही जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही तर आत्मदहन करणार असल्याचे पत्रकार राजेंद्र जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 

खालापूर व कर्जत तालुक्यातील अवैध उत्खनन व भरावाची चौकशी करण्याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापूर तहसिलदार अय्युब तांबोळी, कर्जत तहसीलदार शितल रसाळ यांच्यासह कर्जत-खालापूरमधील सर्व तलाठी, मंडल अधिकारी यांची विभागीय चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कार्रवाई करण्यात यावी, अन्यथा दि. ११ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आत्मदहन करेन, असे अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी यांना मागील एक महिन्यांपूर्वी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, पण लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा देवूनही खालापूर तहसिलदार, कर्जत तहसिलदार व कर्जत प्रातांधिकारी यांच्याकडून अवैध भराव व उत्खननाबाबत कारवाई करण्यात आली नसल्याने दि. २८ मार्च २०२३ पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, माझा जीव गेला तरी बेहत्तर पण कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

उपोषण व आंदोलनाच्या मागण्या :- 

१. कर्जत -खालापूर तालुक्यात २०१८ ते २०२३ या कालावधीत झालेल्या उत्खनन व भरावाची चौकशी करण्यात यावी. भरण्यात आलेली रॉयल्टी व प्रत्यक्ष झालेले याचा अहवाल देण्यात यावा. 

२. या उत्खनन व भरावाबाबत पुरावे देवूनही तसेच निवेदन देवूनही त्याबाबत कार्रवाई करण्यात येत नसल्याने कर्जत उपविभागीय अधिकारी तसेच कर्जत तहसीलदार, खालापूर तहसिलदार यांची विभागीय चौकशी करण्यात यावी. 

३. सन २०१८ ते २०२३ या कालावधीत झालेल्या उत्खनन व भरावाबाबत महसूल प्रशासनातील कर्जत उपविभागातील सर्व तलाठी, मंडल अधिकार, नायब तहसीलदार (महसूल) यांची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्रवाई करण्यात यावी. 

४. सन २०१८ ते २०२३ या कालावधीत झालेल्या उत्खनन व भरावाबाबत करण्यात आलेली चौकशी व करण्यात आलेल्या कार्रवाईबाबत माहिती देण्यात यावी. तसेच सन २०१८ ते २०२३ या कालावधीत झालेल्या उत्खनन व भरावासाठी देण्यात आलेल्या कायदेशीर परवानगीबाबत लेखी माहिती देण्यात यावी.

Post a Comment

Previous Post Next Post