प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात सार्वजनिक बस वाहतूक करण्यात बसेसचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची भेट घेऊन केली. सध्या दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असून त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य पुणेकरांनाही या संपामुळे अतोनात त्रास होत आहे. त्यामुळेच कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारणाऱ्या या ठेकेदारांवर त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल कडक कारवाई करावी. अशी मागणी करून रवींद्र धंगेकर म्हणाले की, या ठेकेदारांच्या थकीत बिलांसंदर्भात संबंधितांशी तातडीने चर्चा करून प्रश्न मिटवावा.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्यशासन यांच्याशी यासंदर्भात तातडीने चर्चा करून हा प्रश्न मिटविण्याचे प्रयत्न करत असल्याचे यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी त्यांच्यासोबत होते.