प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : रवींद्र धंगेकर यांनी आज पहिल्यांदाच पुण्यात पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.मागील अनेक वर्षांपासून पुणे शहरातील नागरिकांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश आलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शहरातील मिळकत करात 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत. मला मत दिलं आणि निवडून आणलं. तसेच जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असं म्हणत धंगेकर यांनी जनतेचे आभार मानले आहे.
पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहेत. त्या सर्व मिळकत धारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकत कर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकत करात सवलत मिळाली पाहिजे, अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजपर्यंत मांडली. त्याचप्रमाणे आज आमदार म्हणून विधिमंडळात हीच मागणी केली, असं धंगेकर म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. आता मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना सवलत दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील 500 फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी. हीच मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले. वाड्यांच्या प्रश्नासंदर्भात मी दोन दिवसांपूर्वी बोललो होतो वेळ पडली तर न्यायालयात जाऊ. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळायला हवा, वाडे पडायला आलेत, विकास होत नाही, गरज पडली तर न्यायालायात दाद मागू, असंही ते म्हणाले.