प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गोष्टी सांगणं आणि ऐकणं हा मराठी भाषेचा रचनात्मक प्रवास असून या भाषेच्या संवर्धनासाठी पालकांचे प्रबोधन व शिबिरांची आता गरज असल्याचे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी आज येथे केले.
मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने कोहिनूर पुरस्कृत 'मराठी रत्न 'पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व कवी रामदास फुटाणे, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र वाळिंबे यावेळी उपस्थित होते. अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे, ज्येष्ठ संपादिका संध्या टाकसाळे, अक्षरधारा बुक गॅलरी च्या संचालिका रसिका राठिवडेकर यांना मराठी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नुतनीकरण झालेल्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ मोरे म्हणाले, संत ज्ञानेश्वर यांच्या काळातही मराठी भाषेपुढे आव्हान होते, पुढे पर्शियन आणि इंग्रजी असा आव्हानात्मक प्रवास सुरू झाला असला तरी सद्यस्थितीत भाषेचे उपकार राज्यकर्त्यांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढील काळात आता पालकांच्या शिबिरांची गरज असून संयोजकांनी आता पालकांना एक पुरस्कार सुरू करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
रामदास फुटाणे यांनी या प्रसंगी, मराठीचा बळी देऊन इंग्रजीचे स्त्रोम नसावे कारण रोजच्या जगण्याची अनुभूती व विविधता केवळ मराठीत असते असे त्यांनी म्हटले.
या वेळी कृष्णकुमार गोयल यांनी, साहित्य परिषदेच्या सभागृहाच्या भव्यते बद्दल कौतुक करून मराठी भाषेच्या विकास व वृद्धीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी पुरस्काराचे तीनही मानकरी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र वाळिंबे यांनी, मराठी भाषेचे महत्व व स्थान संपणार नसून आगामी काळात जग मराठी भाषा शिकायला लागेल असा आशावाद आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे यांनी केले, तर तन्मयी मेहेंदळे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी अभिमान गीत गायले व आभार मानले.