रक्तदान शिबीरात १२५ जणांचे रक्तदान.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन व सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले. सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी. कॉलेज) येथे, सोमवार २० मार्च २०२३ सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात संकलित होणारे रक्त आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज (ए एफ एम सी) ला देण्यात आले.
आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, स. प. जिमखाना, एनसीसी, एनएसएस चा सहभाग या शिबिरात होता. फाऊंडेशनच्या संस्थापक गीता गोडबोले, उपाध्यक्ष लायन सतीश राजहंस, मेजर डॉ. शाहीन भाटी, प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, कर्नल संदीप निगडे, सुजय गोडबोले, रणजीत चामले इत्यादिंनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे व अतुल अग्निहोत्री यांनीही शिबिराला भेट दिली. शहीद दिना निमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सामाजिक उपक्रमातून वीरांचे स्मरण
इ.स. २००३ साली वयाच्या २३ व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ऑपरेशन पराक्रम दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम करण्यासाठी त्यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांनी 'शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन ' स्थापन केले आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस 'शहीद दिवस' म्हणून साजरा केला जात असतो.