न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे दिलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःवर दाखल असलेले गुन्हे लपवून ,खोटी माहिती दिल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या समरी क्रिमिनल केस २७०३६/२०१९ मध्ये एड.सतीश उके यांची उलटतपासणी नुकतीच पूर्ण झाली.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (नागपूर ) यांच्यासमोर ही सुनावणी सुरु आहे.या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते याची उत्कंठा राज्यात आहे.
लोकप्रतिधीत्व कायद्याचे कलम १२५ ए अंतर्गत उके यांनी नागपूर च्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे यासंबंधी खटला दाखल केला होता. पुढे सर्वोच्च न्यायालयातही फडणवीस यांना याप्रकरणी दिलासा मिळाला नाही.त्यांना याप्रकरणी नागपूर न्यायालयाने जामीन दिलेला आहे.या खटल्याच्या सुनावणीदरम्यान फडणवीस यांचे वकील एड. सुबोध धर्माधिकारी यांनी एड. सतीश उके यांची उलटतपासणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे १७ मार्च रोजी पूर्ण केली. एड. उके हे सध्या ३१ मार्च २०२२ पासून प्रवर्तन निदेशालय (ईडी )च्या ताब्यात असल्याने ही उलटतपासणी वारंवार लांबणीवर पडत होती. या प्रकरणाचा निकाल फडणवीस यांच्या विरोधात गेला तर त्यांना ६ महिने कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षाना सामोरे जावे लागू शकते.
देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात १९९६आणि १९९६ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल झाला होता. परंतु दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. अॅड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार, फडणवीसांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. अॅड. सतीश उके २०१४ पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढवत आहेत.