अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन आमदारकीच्या कामाचा श्रीगणेशा केला. पुणेकरांच्या मिळकत करात ४० टक्के सूट द्यावी, मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारू नये, पेठांच्या भागांमध्ये समानदाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन करावे. अशा विविध मागण्यांसंदर्भात कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्यासोबत प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस वीरेंद्र किराड, प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी रमेश अय्यर, कसबा कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव कान्होजी जेधे, आदी उपस्थित होते. या भेटीवेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी रवींद्र धंगेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.
याप्रसंगी रवींद्र धंगेकर म्हणाले की, संपूर्ण देशात पुण्यात मिळकत कर सर्वाधिक असून नागरिकांना मिळकत करात ४० टक्के सवलत देऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारला जाऊ नये. त्यामुळे छोट्या सदनिका धारकांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात विधीमंडळात मी प्रश्न उपस्थित करणार असून राज्यशासनाकडे त्याचा मी पाठपुरावा करेन. असे सांगून ते म्हणाले की, याबरोबरच पेठांच्या भागांमध्ये दाट वस्ती असून तेथे पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सुरळीत पाणीपुरवठा होण्याकरिता योग्य नियोजन करून आमलात आणावे अशी मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली.
या सर्व प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्याने विचार करेल आणि योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले.