हशा, टाळ्या, शिट्ट्यांसह बच्चे कंपनीची धमाल

 मॉरिश फॅमिली फंड, यूएसए व वंचित विकास यांच्यातर्फे ‘अलबत्या गलबत्या’ नाटक


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : गमतीजमती करत हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि बोटांनी 'यो यो' ची पोज घेत शाळकरी दोस्तांनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा मनमुराद आनंद लुटला. या नाटकातील गाण्यांवर ठेका धरत आणि चेटकिणीच्या धूर्त कल्पना, दिलखेचक अभिनय  आणि 'कित्ती गं बाई मी हुश्शार' ची नक्कल अनुभवत चिमुकल्यांनी धम्माल केली.

निमित्त होते, मॉरिश फॅमिली फंड, यूएसए व वंचित विकास यांच्यातर्फे खास बच्चे कंपनीसाठी आयोजित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे. पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेक्षागृहात आयोजित या उपक्रमाचा १७०० हून अधिक लोकांनी लाभ घेतला. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १२ ते ३ असे दोन हाऊसफुल प्रयोग झाले.

वंचित विकासच्या संचालक सुनीता जोगळेकर, वंचित विकासचे खजिनदार उद्धव भडसाळकर, कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांच्यासह नाटकाचे संयोजन केलेल्या तेजस्विनी थिटे, अजयकुमार निकुंभ, शमशुद्दीन शेख आणि मिलिंद जोगळेकर यांनी नाटकांच्या दोन्ही प्रयोगांचे यशस्वी आयोजन केले.

रोजची शाळेची धावपळ, अभ्यासाचा ताण, परीक्षांची चिंता यातून बच्चे कंपनीला बाहेर काढण्यासाठी व काही तास का होईना मोबाईल पासून दूर वास्तवातील निखळ आनंदी जगात आणण्यासाठी अशा प्रकारच्या सुखद उपक्रमांची आवश्यकता आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून वंचित विकास संस्थेने अभिरूची वर्ग, लालबत्ती विभागातील मुले, आश्रमशाळा, पालक, संस्थेचे देणगीदार व हितचिंतक यांच्यासाठी विश्वविक्रमी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाच्या दोन्ही प्रयोगांचे मोफत आयोजन केले होते.

यावेळी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधीही मुलांना देण्यात आली. आपल्या आवडत्या कलाकारांसोबत छायाचित्र घेताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा होता. अद्वैत थिएटर व नाटकाचे निर्माते राहुल भंडारे, चेटकिणीच्या प्रमुख भूमिकेतील निलेश गोपनारायण, अलबत्या गलबत्याच्या भूमिकेत सनीभूषण मुणगेकर, राजकन्या श्रद्धा हांडे व अन्य कलाकारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

सामाजिक संस्थेने एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन हाऊसफुल्ल शो घेतलेली ही आमच्या पहाण्यातली पहिलीच अविस्मरणीय गोष्ट आहे. मुलांची संख्या आणि जल्लोष बघून भारावून गेलेले निर्माते व कलाकारांनीही सर्वांचे आभार मानून सुंदर प्रतिक्रिया दिल्या. नाटकाचा ५५५ प्रयोगाचा टप्पा पार पडल्यामुळे निर्मात्यांनीही अलबत्या गलबत्या ट्रॉफी देऊन संस्थेचा सत्कार केला."मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुलांना जास्तीत जास्त नाटकं दाखवावीत व  पुण्यनगरीची नाटक संस्कृती जिवंत ठेवावी" असे आवाहनही नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post