प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड आणि अजित पवार हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राने पाहिलेल आहे. मात्र 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपने आपली सत्ता काबीज केली आणि अजित पवारांचं वर्षानुवर्ष असलेलं वर्चस्व कमी झालं. त्यामुळे चिंचवड पोट निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवार यांना पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मध्ये कमबॅक करण्याची मोठी संधी होती. त्या दृष्टीने अजित पवार यांनी पाऊलं देखील उचलली. शेवटच्या क्षणापर्यंत राहुल कलाटे यांना उमेदवारी देणार असल्याचं बोललं गेलं. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी निवडणूक लढवली आणि राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत अजित पवार यांची सगळी खेळीच बिघडवली. यानिमित्ताने अजित पवार यांचा पिंपरी चिंचवडच्या स्थानिक नेतृत्वावर किती विश्वास आहे हे देखील अधोरेखित झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील स्थानिक नेते माजी आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यावर अवलंबून न राहण्याची अप्रत्यक्ष रणनिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कायम ठेवली आहे. ''आले तर आल्यासोबत नाही आले तर स्वत:च्या बळावर निवडणूक लढवायची आणि जिंकायची.'' असा निर्धार राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी ठेवला. त्यामुळे निवडणूक निरीक्षण म्हणून जबाबदारी असलेले आमदार सुनील शेळके यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे कामाची चुणूक दाखवली. त्यामुळेच सुरूवातील भाजपाकडे झुकलेली ही निवडणूक चुरशीची वाटू लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी, रॅलीसाठी रस्त्यावर उतरावे लागले.
विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर स्थानिक पातळीवर 'कंट्रोल' करुन भाजपाचा सुपडासाप करण्याच्या आणाभाका करणारे ऐन निवडणुकीत मैदानातून गायब झाले. राजकीय रणनिती आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवून विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला विजयापर्यंत पोहोचवण्याचा वल्गना हवेत विरल्या. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर अजित पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा एकदा पक्ष संघटना बांधणीवर लक्ष देण्याची गरज असल्याचं या पोटनिवडणुकीतून समोर येत आहे.
एकूणच कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणूक या दोन्ही शहराच्या महानगरपालिका इतकच नाही तर राज्याच्या राजकारणाचा ट्रेंड सेट करणाऱ्या ठरतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांसोबतच राज्यभरातील नेते गेल्या महिन्यापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तळ ठोकून होते. आता दोन मार्चला निकाल लागल्यानंतर राज्याचा राजकारणाचा कल नक्की कसा राहणार हे दिसेलच.