पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी, पुणे (दि.२५ मार्च २०२३) - प्रसिद्ध लेखक अजित कुमार झा यांनी लिहिलेल्या 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया: इयर २०१४ ते २०२२' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये नुकतेच करण्यात आले.

ईशान्य क्षेत्र विकास आणि संस्कृती, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, खासदार भुवनेश्वर कलिता, पद्मश्री आलोक मेहता, ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार बिपलव कुमार देब, प्रसिद्ध पत्रकार राजू वाघमारे, सचिन ईटकर, विविध सरकारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति उपस्थित होते. 


ईशान्य प्रदेशाच्या विकासाचा इतिहास नोंदवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या उन्नतीसाठी दृढनिश्चय आणि संकल्प केला आहे. गेल्या सात वर्षांत (२०१४-२०२२) ईशान्य भारतात विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्याचे सिंहावलोकन या पुस्तकात केले आहे. अजित कुमार झा हे एक अनुभवी सरकारी अधिकारी आहेत, आणि त्यांचे हिंदीतील पुस्तक, 'सशक्त पूर्वोत्तर, दक्षिण पूर्व एशिया का द्वार' खूप गाजले होते.

पुस्तक प्रकाशनानंतर 'ईशान्य क्षेत्राचा आणखी विकास कसा करायचा आणि या क्षेत्राच्या यशाला भारताच्या वेगवान विकास गतीशी कसे जोडता येईल' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड विश्वविद्यालय तर्फे ईशान्य भारतातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Post a Comment

Previous Post Next Post