अरुण गवळीने खंडपीठासमोर याचिका दाखल करत मुदतपूर्व सुटकेची विनंती केली



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठासमोर अरुण गवळी याने याचिका दाखल केली आहे. आपण वयाची सत्तरी गाठली असून नियमांप्रमाणे तुरुंगातून सुटका करण्याची विनंती खंडपीठाकडे केली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात अरुण गवळी सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र, अरुण गवळीने खंडपीठासमोर याचिका दाखल करत मुदतपूर्व सुटकेची विनंती केली आहे. मी वयाची सत्तरी गाठली असून हत्या प्रकरणात 14 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास ही भोगला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या वर्ष 2006 च्या परिपत्रकानुसार माझी तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी अशी मागणी अरुण गवळीने केली आहे. मुंबईतील गुन्हेगारी जगतावर वर्चस्व ठेवणारा हा कुख्यात डॉन तुरुंगातून बाहेर आल्यास मुंबईवर त्याचे काय परिणाम होतील, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

एकेकाळी मुंबईचा डॉन म्हणून ओळख मिळवणाऱ्या अरुण गवळीची टोळी गेल्या 16 वर्षात नामशेष झाली आहे. राजकीय प्रवेशासाठी अरुण गवळीने उभारलेली अखिल भारतीय सेना त्या काळात महापालिकेपासून विधानसभेपर्यंत पोहोचली होती. मात्र, अरुण गवळी गेली 16 वर्ष तुरुंगात असल्यामुळे अखिल भारतीय सेना हा राजकीय पक्षदेखील अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे, वयाच्या सत्तरीपर्यंत पोहोचलेला डॉन अरुण गवळी आता तुरुंगातून बाहेर आला तरी त्याचे फारसे परिणाम होणार नाही असेच जाणकारांना वाटत आहे. याआधी अरुण गवळी आमदार झाल्यानंतर त्याच्याकडून खंडणी वसूल केली जात असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर नगरसेवक जामसांडेकर यांच्या हत्येत त्याला अटक झाल्यानंतर गवळीच्या गुन्हेगारी कृत्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या होत्या. नागपूर खंडपीठात 15 मार्च रोजी या प्रकरणी सुनावणी होणार असून तेव्हा अरुण गवळीची सुटका होणार की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, अरुण गवळी या एकेकाळच्या अंडरवर्ल्ड डॉनची सुटका झाल्यास त्याचे परिणाम आर्थिक राजधानी मुंबईतही झाल्याशिवाय राहणार नाही असेही म्हटले जात आहे.


दरम्यान, अरुण गवळीने न्यायालयात याचिका करण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाकडेही अशीच मागणी केली होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने वर्ष 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने 2006 च्या परिपत्रकात केलेल्या सुधारणेचा आधार घेत सुटका करण्यास नकार दिले


राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना 14 वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय 65 पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल. अरुण गवळीचा जन्म 1955 चा असल्याने त्याचे वय 68 वर्ष आहे. जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून तुरुंगात असल्याने गेली 16 वर्ष तो तुरुंगात आहे. वर्ष 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो. त्याच आधारावर अरुण गवळीने त्याच्या वकिलांच्या मार्फत न्यायालयाला तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी केली आहे.


अरुण गवळीचा काय आहे इतिहास?


दगडी चाळ पासून गुन्हे विश्वात आपली ओळख निर्माण करणारा अरुण गवळी परदेशात पळून न जाता, मुंबईत बसून अंडरवर्ल्ड चालवणारा एकमेव डॉन होता. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अबू सालेम यांच्यासारखा तो परदेशात पळून गेला नाही. दाऊद इब्राहिम आणि इतर मुस्लिम गुन्हेगारांच्या टोळ्यांसोबत अरुण गवळीच्या खुनी संघर्षामुळे त्याला एकेकाळी हिंदू डॉन अशी उपमाही मिळाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही काही भाषणातून हिंदू डॉन अरुण गवळीला अप्रत्यक्ष पाठिंबा देत त्याच्या विरोधातील पोलीस कारवायांवर टीका केली होती. तेव्हा बाळासाहेबांनी अरुण गवळी, साई बनसोड यांच्यासाठी "आमचे मुलगे" असे शब्दप्रयोग वापरले होते. पुढे युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना अंडरवर्ल्ड विरोधात गृह विभागाच्या कारवायापासून पुरेसं संरक्षण न मिळाल्यामुळे अरुण गवळी शिवसेना पासून दुरावला गेला असल्याची चर्चा आहे.

अरुण गवळीने शिवसेनेला आव्हान देत शिवसेनेच्या पद्धतीनेच अखिल भारतीय सेना उभारली. शिवसेनेचा कॅडर आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. प्रभादेवी परिसरात बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत विश्वासू जयंत जाधव यांच्या हत्या प्रकरणानंतर अरुण गवळी शिवसेनेच्या रडारवर आला. अरुण गवळी याने 2004 मध्ये दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याने तब्बल 90 हजार मते घेतली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गवळी भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेला. पुढे 2006 मध्ये घाटकोपर परिसरात शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची अरुण गवळीच्या टोळीने हत्या केली. त्याच प्रकरणात अरुण गवळी ला अटक होऊन पुढे जन्मठेपेची शिक्षा झाली.

Post a Comment

Previous Post Next Post