वृत्तपत्र विक्रेता संघटनेची महालक्ष्मी व्यवस्थापनाकडे मागणी
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या महालक्ष्मी दिनदर्शिकेत 15 ऑक्टोबर या दिवशी वृत्तपत्र विक्रेता दिनाची नोंद करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने महालक्ष्मी दिनदर्शिका व्यवस्थापनाकडे करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते व पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन महालक्ष्मी दिनदर्शिका व्यवस्थापक कपिल जांभळे यांच्याकडे दिले. निवेदनावर राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारुती नवलाई राज्य कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 2018 पासून भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्र सह देशातील जवळपास सर्वच राज्यात हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा होत आहे. आपली महालक्ष्मी दिनदर्शिका संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात तसेच देशात ही अनेक ठिकाणी पोचली आहे या दिनदर्शिका वृत्तपत्र विक्रेता दिनाचा उल्लेख व्हावा अशी आमची विनंती आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे धनंजय शिराळकर, राजाराम पाटील, सुरेश ब्रह्मपुरे, महेश घोडके व परशराम सावंत यांच्यासह महालक्ष्मी दिनदर्शिकेचे संजय घोसाळकर, विक्रम भोसले व विनायक देवणे आदी उपस्थित होते.