मूळ रक्कम परत मागणाऱ्या गुंतवणूकदारास एजंट दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सकडून गुंतवणुकीवरील परतावा थांबल्यानंतर मूळ रक्कम परत मागणाऱ्या गुंतवणूकदारास एजंट दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.हा प्रकार तीन मार्चला फुलेवाडी रिंगरोड येथे शिवदत्त कॉलनीत घडला.
याबाबत पूजा सागर शिंदे (वय २७, रा. गंगाई लॉन, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रमेश चौगुले (पूर्ण नाव नाही) आणि अश्विनी रमेश चौगुले (दोघेही रा. शिवदत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी शिंदे यांनी ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा एजंट रमेश चौगुले याच्याकरवी कंपनीत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुरुवातीचे काही महिने त्यांना परतावा मिळाला. त्यानंतर मात्र परतावा थांबल्याने मूळ गुंतवलेली रक्कम परत मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी एजंटकडे सुरू केली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्या एजंटकडे पैसे मागत आहेत. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देऊन एजंटकडून टाळाटाळ सुरू आहे.
तीन मार्चला त्या एजंटच्या घरी जाऊन गुंतवलेली रक्कम परत मागत होत्या. त्यावेळी एजंट रमेश चौगुले याने शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच अश्विनी चौगुले हिने धक्काबुक्की करीत मारण्याची धमकी दिली. याबाबत शिंदे यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्याकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.