गाभ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

   कैलास वाघमारे दिसणार रोमँटिक अंदाजात


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  वेगळे कथानक आणि आशय असणारा गाभ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास  वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवे काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपले आहे. त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. आगामी ‘गाभ’ या मराठी चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारणार आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून  होणारा बदल आणि त्या बदलाची कथा अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ हा चित्रपट आहे.

टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांची आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण दिमाखात संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.  

आपल्या भूमिकेबद्दल कैलास सांगतो की, ‘गाभ’मधील भूमिका ही अतिशय वेगळ्या स्वरूपाची असून प्रेक्षकांसाठी तो एक सुखद धक्का असेल. आजवर केलेल्या विविध भूमिकांपेक्षा खूपच वेगळी व्यक्तिरेखा यात साकारायला मिळाली, याचे समाधान आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणूस त्याच्या गुण-दोषांसह ‘हिरो’ असू शकतो, हे दर्शवणारी ही भूमिका आहे. अभिनेत्री सायली बांदकर सांगते मी शहरी भागात वाढलेली असल्यामुळे पूर्णपणे अपरिचित अशा ग्रामीण भागाशी जुळलेल्या या कथानकामधील भूमिका खूपच आव्हानात्मक होती, माणसांसोबत काम करणं सोपं असतं पण अनोळखी जनावरांच्या संगतीत काम करणं अवघड असते. एकदा जनावराचा विश्वास संपादन केला की ते तुम्हाला आपलेसे करते. त्या अर्थाने खूप काही शिकवणारा आणि समृद्ध करणारा अनुभव म्हणजे ‘गाभ’ चित्रपट आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आणि सहनिर्माते अनुप जत्राटकर सांगतात की, एक विचार या चित्रपटातून मांडताना त्यातील आशावादही आम्ही चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा ‘गाभ’केवळ ‘शारीरिक’ नसून ‘वैचारिक’देखील आहे. केवळ काहीतरी करूया म्हणून हा चित्रपट केलेला नाही तर आजवर कधीही रुपेरी पडद्यावर आली नाही अशी एक गोष्ट आम्ही सादर करीत आहोत. शहरी प्रेक्षकांनाही आवडेल असा हा चित्रपट आहे. प्रेक्षक चित्रपटाशी पूर्णपणे एकरूप होईल. यातल्या पात्रांसोबत तो हसेल आणि त्यांच्या दु:खाने हळहळेलही! निर्माते मंगेश नारायण गोटुरे म्हणाले की, ‘गाभ’ची कथाच इतकी भन्नाट होती की ती ऐकताक्षणीच निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. ज्याला ज्याला कथा ऐकवली त्या सर्वांनी त्यात काम करण्याची तयारी दाखवली. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात चित्रीकरण झाले असले तरी निर्मितीमूल्यांच्या बाबतीत आम्ही कोठेही तडजोड केलेली नाही. मे महिन्यात चित्रपट प्रदर्शित होईल.

‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, विकास पाटील, सायली बांदकर, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रवींद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साउंड डिझाइनची चंद्रशेखर जनवाडे तर जबाबदारी पार्श्वसंगीताची रवींद्र चांदेकर यांनी सांभाळली आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजित कोसंबी, सावनी रवींद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गाणू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्युसर चंद्रशेखर जनवाडे तर प्रोडक्शन मॅनेजर रंगराव पाटील आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post