जिल्ह्यातील ८० हजारांवर कर्मचारी व शिक्षक या संपात सहभागी झाले
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आज पासून सरकारी निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. जिल्ह्यातील ८० हजारांवर कर्मचारी व शिक्षक या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे काल, सोमवारी दुपारनंतरच अनेक सरकारी कार्यालयात शुकशुकाट होता.राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत संघटनेची बैठक झाली. त्यात तोडगा न निघाल्याने सायंकाळी संघटनांनी संप सुरू करत असल्याचे जाहीर केले.
आज मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत टाऊन हॉलमध्ये संघटनेच्या प्रमुखांची भाषणे होतील. त्यानंतर शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. टाऊन हॉल, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी रोडमार्गे बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक ते पुन्हा टाऊन हॉल असा रॅलीचा मार्ग असेल. शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत संप सुरू राहील, असे संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सांगितले.