अपहरण केलेल्या सहा वर्षीय मुलाचा ४८ तासात शोध घेऊन पोलिसांनी सुटका केली

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर परिसरातून दाम्पत्याने अपहरण केलेल्या सहा वर्षीय मुलाचा ४८ तासात शोध घेऊन पोलिसांनी सुटका केली.मुलाचे अपहरण करणारे मोहन आंबादास शितोळे (वय ५०) आणि छाया मोहन शितोळे (वय ३०, दोघे रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली.मूल होत नसल्याच्या कारणातून दाम्पत्याने सहा वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज, मंगळवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत सांगितले.

अधिक माहिती अशी की, सुषमा राहुल नाईकनवरे (रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा, जि. सातारा) या त्यांच्या सहा वर्षीय मुलासह शुक्रवारी (दि. ३) आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शनानंतर त्या मुलासह भक्तनिवासमध्ये थांबल्या होत्या. शनिवारी (दि. ४) सकाळी साडेआठच्या सुमारास त्या आंघोळीला गेल्या असता, एक दाम्पत्य त्यांच्या मुलाला घेऊन गेले. मुलाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच नाईकनवरे यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दिली. पौर्णिमेपूर्वी तीर्थक्षेत्रावरून घडलेल्या बालकाच्या अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा गतिमान केली. आदमापूर येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा माग काढण्यात आला.संशयित दाम्पत्य मुलाला घेऊन निपाणी, चिक्कोडी, अंकली, मायाक्का चिंचणी मार्गे मिरजकडे गेल्याचे तपासात लक्षात आले. त्यावरून पोलिस सोलापूर जिल्ह्यातील जावळा येथील मोहन शितोळे या संशयिताच्या घरी पोहोचले. मुलाची सुखरूप सुटका करून पोलिसांनी शितोळे दाम्पत्याला अटक केली. स्वत:ला मूल होत नसल्यानेच मंदिराच्या भक्त निवासातून मुलाला सोबत आणल्याची कबुली संशयित शितोळे दाम्पत्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post