प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
हमिदवाडा तालुक्यातील वेदगंगेवरील बस्तवडे बंधाऱ्याच्या पूर्वेला सोनगे (मूळ गाव खडकेवाडा) ता. कागल येथील संजय आनंदा तोरसे (वय ४४ ) हा तरुण मंगळवारी (दि.७) सकाळी बुडाला होता.त्याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी रेस्क्यू टीमला सापडला. याबाबतची अधिक माहिती अशी की, सोनगे गावची यात्रा येत्या बुधवारी आहे.त्यामुळे धुणे धुण्यासाठी आपली पत्नी,मुले,वडील,मुलगी यांच्यासह तोरसे हे सोनगे येथुन बस्तवडे बंधाऱ्याच्या जवळ आले होते.
सर्व धुणे धुऊन झाल्यानंतर तोरसे हे आपल्या मुलांसह आंघोळीसाठी नदीत गेले.आनुरकडील बाजूस जाऊन परत येताना विक्रांत व आविष्कार ही त्यांची मुले पुढे आली पण संजय तोरसे हे भोवऱ्यात अडकले तसेच पाण्याचा प्रवाह देखील मोठा असल्याने त्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही. मुरगुड पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते.तोरसे हे मंडलिक कारखान्याचे कर्मचारी होत.सलग दोन दिवस गडहिंग्लज येथील आपत्कालीन बोटच्या माध्यमातून रेस्क्यू टीम व जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याकडून शोध मोहीम सुरू होती.
अखेर बुधवारी सायंकाळी हा मृतदेह सापडला.मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.कुटुंबियांसमोरच ही घटना घडल्याने सर्वांनी ह्र्दयद्रावक असा टाहो फोडला होता.तोरसे यांच्यामागे वडील, पत्नी,मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.