प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : विदेशी बनावटीचा मद्यसाठा घेऊन जाणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी गावाजवळ आज सकाळी पकडुन कारवाई केली. कंटेनरचालक दिनेश जेकनराम कुमार (वय ३०, रा. कावोकी बेरी, जि. बाडमेर, राजस्थान) यास अटक केली आहे.
पुणे-बेंगळुरू महामार्गावरून एका सहाचाकी कंटेनरमधून विदेशी मद्यसाठा मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांना मिळाली होती. त्यानुसार तडवी यांनी निरीक्षक एस. जे. डेरे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. महामार्गावर किणी गावाजवळ दबा धरून बसलेल्या पथकाने गुरुवारी सकाळी एक संशयित वाहन अडवले. त्याची झडती घेताना विदेशी मद्याचे ४०० बॉक्स आढळले. पथकाने ३५ लाख ५३ हजार २०० रुपयांचे मद्य आणि ११ लाख रुपयांचा कंटेनर असा ४६ लाख ५३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कंटेनर चालक दिनेश कुमार याला अटक केली असून, मद्यसाठा कुठून आणला आणि कोणाला पाठवला जाणार होता, याचा तपास सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, योगेश शेलार यांनी कारवाईत सहभाग घेतला.