विद्यार्थिनींनी आपला अवकाश त्या पद्धतीने वापरून यशस्वी झाले पाहिजे.आपल्या यशाचे नियोजन आपणच केले पाहिजे आणि त्यासाठीचे अग्रक्रम ठरवले पाहिजेत ..श्रीमती सुजाता शिंदे .



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.८ समाज जीवनात वावरत असताना सुरक्षित असे क्षेत्र कोणतेच नसते. तर ती सुरक्षितता आपण निर्माण करावी लागते. आपल्याला हिरा व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला पैलू पाडून घडवता आलं पाहिजे. आपल्याला मिळालेला अवकाश आपण कसा वापरायचा हे ज्याला कळतं तो यशस्वी होतो. विद्यार्थिनींनी आपला अवकाश त्या पद्धतीने वापरून यशस्वी झाले पाहिजे.आपल्या यशाचे नियोजन आपणच केले पाहिजे आणि त्यासाठीचे अग्रक्रम  ठरवले पाहिजेत ,हाच महिला दिनाचा खरा संदेश आहे असे मत हातकणंगले तालुका महिला बालविकास अधिकारी  श्रीमती सुजाता शिंदे यांनी व्यक्त केले.त्या जागतिक महिला दिन आणि कन्या सुकन्या सन्मान सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून  " स्त्री: अबला नाही तर सबला काल,आज,उद्या " या विषयावर बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती आ. रा.पाटील कन्या महाविद्यालय ,समाजवादी प्रबोधिनी, महिला सक्षमीकरण व तक्रार समिती आणि माजी विद्यार्थिनी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.त्रिशला कदम होत्या. मंचावर समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, माजी विद्यार्थीनी संघटनेच्या सदस्य व कराटे प्रशिक्षिका किरण चौगुले, प्रा.कॅप्टन प्रमिला सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी रोपट्याला पाणी घालून व मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक प्रा. कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती सुजाता शिंदे यांच्या हस्ते कु. श्वेता भोंगाळे या विद्यार्थिनीचा कन्या सुकन्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.तसेच महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा आणि संविधान गुणगौरव परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


श्रीमती सुजाता शिंदे म्हणाल्या, राजमाता जिजाऊसाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराराणी,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अशा अनेकांच्या चरित्रातून आपल्याला आदर्श सापडतात. विपरीत परिस्थिती असली तरी तिचे भांडवल न करता आत्मविश्वासाने आणि कष्टाने ती परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आपण बाणवून घेतलं पाहिजे. हातात सगळं असलं तरी त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आपण ठरवलं तर उकिरड्याची बाग करण्याचे  सामर्थ्य व कौशल्य प्रत्येक स्त्रीमध्ये असते.शिक्षण ,अनुभव या गोष्टी गरजेच्या आहेतच पण आपला यशासाठी संघर्षाची तयारी अत्यंत महत्त्वाची असते. आजच्या विद्यार्थिनी हे राष्ट्राचे उद्याचे भविष्य असून ते उज्वल करण्यासाठी आपणच झटण्याची गरज आहे. श्रीमती सुजाता शिंदे यांनी आपल्या सविस्तर भाषणातून  शिक्षण,क्रीडा ,स्पर्धा परीक्षा याबाबतचे मार्गदर्शन करूनच आपली दुष्काळग्रस्त रक्त आणि कोल्हापूरच पाणी यातून घडलेली संघर्षमय पण यशस्वी वाटचालही विशद केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्या डॉ. त्रिशला कदम म्हणाल्या, महिला दिन हा केवळ एक दिवस नव्हे तर  रोज महिला सन्मान दिन म्हणून साजरा केला पाहिजे. भौतिक परिस्थिती चांगली असेल तर स्थितीवादी राहण्याची भीती असते. म्हणूनच विपरीत परिस्थितीशी सामना करत यशाला गवसणी घालण्यातला आनंद अतिशय वेगळा असतो. तो आनंद प्राप्त करणे ही अतिशय सन्मानजनक बाब असते. विद्यार्थिनींनी आपले उद्दिष्ट ठरवून त्यानुसार वाटचाल करण्याची तयारी ठेवली पाहिजे. यावेळी श्रीमती सुजाता शिंदे यांच्यासमोर विद्यार्थिनींनी जुडो कराटे चे प्रात्यक्षिक सादर केले. त्याच पद्धतीने महिला दिनानिमित्तच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले. संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सौदामिनी कुलकर्णी, रविकिरण चौगुले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. सोनाली बोरगावकर यांनी आभार मानले. डॉ. संपदा टीपकुर्ले आणि प्रा. संगीता पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post