प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : गुंतवलेली रक्कम आठवड्यात दुप्पट करून देऊ तसेच ४५ दिवसांत कमी व्याज दराचे कर्ज मिळवून देऊ, असे आमिष दाखवून नदाफ-मकानदार टोळीने जिल्ह्यात १४ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे .या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, या टोळीने लोकांकडून ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचा अंदाज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी वर्तविला.
रेश्मा बाबासो नदाफ (वय ४१, रा. चंदूर रोड, इचलकरंजी) आणि शब्बीर बाबालाल मकानदार (वय ६२, रा. नदीवेश नाका, इचलकरंजी) यांच्यासह अन्य नऊ संशयितांनी दिल्लीतील युनिक फायनान्स कंपनीचे एजंट असल्याचे सांगत लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. डिसेंबर २०२१ पासून ते ऑगस्ट २०२२ या नऊ महिन्यांत नदाफ-मकानदार टोळीने लोकांकडून ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळली.
सुरुवातीला ४५ दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतले. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली कर्जाच्या एकूण रकमेपैकी पाच टक्के रक्कम आधीच घेतली. त्यानंतर लोकांना सात दिवसांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला छोट्या रकमा दुप्पट देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या रकमा घेऊन पोबारा केला. नदाफ आणि मकानदार यांच्या अटकेनंतर अधिक चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. लवकरच संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले.