जयंतराव पाटील हेच दुष्काळी तालुक्यांचे खरे भगिरथ . - सादिक खाटीक

 विधानसभेला आटपाडीकर महिलेला संधी द्या . - सौ. अश्विनीताई - कासार अष्टेकर .



प्रेस मीडिया लाईव्ह :

आटपाडी :

    १९९० पासून सत्तेत असताना आमदार, मंत्री म्हणून आणि विरोधात असताना लक्षवेधी आमदार म्हणून जयंतराव पाटील यांनी गत ३२ वर्षात कृष्णा - कोयनेचे पाणी दुष्काळी तालुक्यांना मिळावे म्हणून प्रचंड कार्य केले आहे . हे लाखो लोकांसह त्यांचे विरोधकही मान्य करतील . आमदार जयंतराव पाटील हेच लाखो दुष्काळग्रस्तांचे खरे भगिरथ आहेत, असे मत सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .

                राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी" या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या पंधराव्या आणि आटपाडीतल्या बाराव्या गाव - प्रभाग भेटीच्या बैठकीवेळी  सादिक खाटीक बोलत होते .

                प्रमुख अतिथी म्हणून यमाजी पाटलाची वाडीचे सरपंच राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव माने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्षा सौ. अश्विनीताई कासार - अष्टेकर , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ . सुजाता टिंगरे, मुस्लीम समाजाचे नेते इंजिनीयर असिफ कलाल, दिलावर शेख हे उपस्थित होते .

                सादिक खाटीक पुढे म्हणाले, आटपाडीच्या १२, तासगांवच्या १७, खानापूरच्या ११, खटावच्या २१, माणच्या २७, आणि जतच्या ४ आणि इतर तालुकेतील गावे मिळून ११९ गावांना डोळ्यासमोर ठेवून, आहे त्या व्यवस्थेत, कमी खर्चात, जास्तीत जास्त क्षेत्र ओलीताखाली येवून कोणावरही अन्याय होणार नाही अशा दुरदृष्टीतुन जयंतराव पाटील यांनी कृष्णा नदीत उपलब्ध झालेल्या अतिरिक्त पाण्यातून, ८ टीएमसी पाणी टेंभू योजनेजवळच्या पण या योजनेत नसणाऱ्या ११९ गावांसाठी राखून ठेवण्याची कामगिरी केली . जलसंपदा मंत्री असताना, हे पाणी कसे उपलब्ध होते याचा पुरावा त्यांनी तयार केला . आपल्या निर्णयाला राष्ट्रीय पाणी लवादात कोणत्याही राज्याकडून आव्हान दिले जाणार नाही असे नियोजन केले . त्यामुळे येथून पुढच्या पिढ्यांना आपल्या हक्काच्या ८ टीएमसी पाण्यावर आपली मालकी सांगता येणार आहे . आणि ते समान पद्धतीने शेतकऱ्यांना वाटून द्यावे लागणार आहे . केवळ आटपाडी तालुक्यातीलच आणि टेंभूच्या कार्यक्षेत्रातीलच नव्हे तर म्हैशाळ योजनेपासून वंचित राहणाऱ्या जत तालुक्यातील ६५ गावांसाठीही कृष्णेचे ६ टीएमसी पाणी आरक्षीत ठेवण्याचे धोरण जयंतराव पाटील यांनी पुर्णत्वास नेले आहे . त्या अडीच वर्षात त्यांनी योजनांना पुरेसा निधी देण्याबरोबरच अतिरिक्त पाणी शोधून त्याच्यावर दुष्काळी तालुक्यांचा हक्क प्रस्थापीत करण्याचे खुप महत्वाचे काम कोठेही गाजावाजा न करता केले . आता आटपाडी सह इतर दुष्काळी तालुक्यांचे वाढविलेले हक्काचे पाणी कोणीही काढून घेऊ शकणार नाही . ते मिळणारच आहे, आणि महात्मा जोतिबा फुलेंना अपेक्षित असणारा समान न्याय साधला जाणार आहे .

                २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत खानापूर विधानसभा मतदार संघातून आटपाडी तालुका वाशीयच राष्ट्रवादीचा आमदार व्हावा . यासाठी येत्या कालावधीत प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची भावना व्यक्त करून सादिक खाटीक यांनी, आज पर्यतच्या विधानसभेच्या एकूण निवडणुकापैकी १३ वेळा खानापूर तालुका वाशीय, आणि फक्त २ वेळाच आटपाडी तालुका वाशीय आमदार झाले . हे वास्तव निदर्शनास आणून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आटपाडी तालुका वाशीय नेत्यालाच मिळाली पाहीजे, आणि ते महोदय जिंकले पाहीजेत, या दृष्टीने येत्या दीड वर्षाच्या कालावधीत मतदार संघात आपण अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी मोहीम उघडणार आहोत. असे स्पष्ट केले .

                खानापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीची उमेदवारी आटपाडी तालुक्याला मिळाली पाहीजे ही मागणी रास्तच आहे . तथापि मतदार संघाच्या आजवरच्या एकाही निवडणूकीत महिलेला उमेदवारी मिळालेली नाही, हे लक्षात घेऊन आटपाडी तालुक्यातील कोणत्याही जाती धर्माच्या कर्तृत्वसंपन्न महिलेला खानापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देवून निम्म्या लोकसंख्येचा आदर करावा . असे स्पष्ट करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्षा सौ. अश्विनीताई कासार - अष्टेकर यांनी, खानापूर, आटपाडी तालुके आणि विसापूर सर्कल मध्ये राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, दिवंगत नेते माजी मंत्री आर आर आबा पाटील आणि आमदार श्री . जयंतराव पाटील साहेबांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे . आटपाडी तालुक्यातल्या महिलेला उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादीचा विजय निश्चित होणार आहे . अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या . वेगवेगळ्या ३ प्रोजेक्ट उभारणीतून शेकडो महिलांना रोजगार मिळवून देणार आहोत . असेही सौ . अश्विनीताई कासार - अष्टेकर यांनी स्पष्ट केले .

                सरपंच संभाजीराव माने यांनी शुभेच्छा दिल्या तर सामाजीक कार्यकर्ते असिफ उर्फ बाबू खाटीक यांनी आटपाडीतल्या यापुढच्या एखादया गाव - प्रभाग भेटीच्या बैठकीला माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना आमंत्रित करावे अशी सुचना मांडली .

                प्रारंभी स्वागत सौ . मुमताज खाटीक यांनी तर प्रास्तावीक रियाज शेख यांनी केले .

                यावेळी शंकररावआबा हाके, शब्बीर मुलाणी, अमीर खाटीक, यश सावंत, बाळासाहेब ढगे, रॉमी शेख , रोहीत लांडगे, गणेश लांडगे, इरफान शेख, सौ . रेश्मा बंडगर सौ . शुभांगी जवळे, अमृता बनसोडे, सारीका मांजरेकर, धनश्री गायकवाड, राबियॉबसरी खाटीक, इशरतजहाँ खाटीक, सिमरन खाटीक, शिफा शेख कोंदनबी शेख, तायराबी खाटीक, रशिदाबी खाटीक, शाबेरा खाटीक इत्यादी अनेक जण उपस्थित होते . शेवटी शब्बीर मुलाणी यांनी आभार मानले .

Post a Comment

Previous Post Next Post