(वाचकांचा पत्रव्यवहार साठी )
प्रेस मीडिया लाईव्ह :
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अंगावर गाडी घालून दिवसा ढवळ्या त्यांची हत्या करण्यात आली.ही गोष्ट अतिशय संतापजनक आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई होऊन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. पत्रकारांवरील हल्ला म्हणजे मस्तवाल झुंडशाहीने संविधानिक लोकशाही वर केलेला हल्ला असतो.तसेच तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य या वरीलही हल्ला असतो.कोणत्याही बातमीच्या तळाशी जाऊन सत्य सांगण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात. बातमी मागील जी महत्त्वाची बातमी असते ते ती काढत असतात.
त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला हा सत्यावरीलही हल्ला असतो. असे हल्ले होण्याचे प्रमाण अलीकडे वाढत चाललेले आहे .त्यामुळे पत्रकारिताच धोक्यात आलेली आहे. एक प्रकारचे भीतीच सावट पत्रकारितेवर पसरलेला आहे.
पत्रकार संरक्षण कायदा आहे हे खर आहे. परंतु त्या कायद्याअंतर्गत किती गुन्हेगारांना शिक्षा होते ? हा संशोधनाचा विषय आहे. कारण मुळात या कलमाखाली गुन्हे नोंद करून घेण्याचीच अनेकदा टाळाटाळ होते. कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी न झाल्याने असे हल्ले वाढत आहेत. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाला तर हल्लेखोराला तीन वर्षे शिक्षा ,पन्नास हजार रुपये दंड आणि सर्व प्रकारची नुकसान भरपाई भरून द्यावी लागते. पण असे फारसे होत नाही. राजकारण आणि गुन्हेगारी यांच्या एकत्रिकरणातून पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण आणि धारिष्ट वाढत चाललेले आहे. दरवर्षी जागतिक माध्यम स्वतंत्रता सुचकांक प्रकाशित केला जातो. गेल्या काही वर्षात त्यात आपण अधिक खालावत चाललो आहोत. आज जागतिक प्रेस स्वतंत्रता सुचकांकात आपण जगात १४२व्या क्रमांकावर आहोत. लोकसंख्येपासून अर्थव्यवस्थेच्या आकारापर्यंत आपल्या वाढीची चर्चा होत असताना माध्यम स्वातंत्र्या बाबतची ही घसरण लक्षात घेतली पाहिजे. त्यात सुधारणा करायची झाली तर सर्वप्रथम पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना त्वरित व कठोर शासन झाले पाहिजे.
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी
( ९८५०८ ३०२९०)