प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडला असून सुरक्षरक्षकांदेखत घडलेल्या प्रकारामुळे पालिकेचे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलींना मारण्याची धमकी देतो का असे बोलत कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी ते सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदुक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याचठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याच्या संभाषणाची एक ध्वनिफीत प्रसारित झाली असून या ध्वनिफितमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. ही ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर हा हल्ला झाला आहे