दत्तवाड येथील 150 एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ (प्रतिनिधी) :
दत्तवाड येथे 700 ते 800 एकर जमीन क्षारपड बनली आहे. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती केली पाहिजे. सामुदायिक विचाराने शेती करण्याच्या पद्धतीला दिशा देणे आवश्यक आहे. एकत्र येऊन एकाच निर्णयाने शेती ही फायद्याची बनेल. या कामात जात, पात, धर्म, राजकारण करण्याची भूमिका नाही. शेतकऱ्यांनी दिलखुलासपणे क्षारपड मुक्तीच्या या योजनेत सहभाग घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
दत्तवाड येथील 150 एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुख्य पाईपलाईन सर्व्हे कामाचे उद्घाटन श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणपतराव पाटील बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या क्षारपड मुक्त जमीन सुधारणा प्रकल्पात सहभाग घेतला आहे. आज या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली.
सरपंच चंद्रकांत कांबळे म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षारपड मुक्तीची योजना राबविलेला दत्त साखर कारखाना हा पहिलाच कारखाना आहे. शेती ही शेतकऱ्यांचा आत्मा आहे. शेती नापीक अथवा नष्ट झाली तर शेतकऱ्याला गळफास घेण्याची पाळी येते. अशा शेतकऱ्यांना दादांनी जीवनदान देण्याचे काम केले आहे. आज हजारो लोक चांगले जीवन जगत आहेत. आगामी काळातही दादांनी या कामांमध्ये आमच्या पाठीशी राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना व इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे यांनी या योजनेची संपूर्ण माहिती सांगितली. राजू गुमटे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक प्रविण सुरवंशी यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले. यावेळी समन्वयक चंद्रशेखर कलगी, इंजिनिअर सुदर्शन तकडे, देवेंद्र सूर्यवंशी, दळवी सरकार, प्रभाकर पाटील, संजय पाटील, सुकुमार सिदनाळे, तंटामुक्त समितीचे सुरेश पाटील, सुधाकर गळतगे, पी. एम. पाटील, सुरेश पाटील, प्रकाश चौगुले, शितल धोतरे, अप्पासो सिदनाळे, संजय सुतार आदी शेतकरी उपस्थित होते.