प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/प्रतिनिधी:
ट्रॅक्टर मोटार सायकल अपघातात मृत्यू पावलेल्या ट्रॅक्टर मालक व कंत्राटदाराच्या वारसास मजूर विमा योजनेतून उतरवलेल्या विम्याचा धनादेश आज देण्यात आला. श्री दत्त साखर कारखाना व ऊस वाहतूक संघटना शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला.
दिलीप भगवान प्रधान (वय 35, रा. गोळेगाव, ता. परतूर, जि. जालना) हे दत्त सहकारी साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर मालक व कंत्राटदार होते. कारखान्यामार्फत मजूर विमा योजनेतून त्यांचा विमा उतरवण्यात आला होता. दिनांक 13 जून 2021 रोजी गोळेगाव येथे ट्रॅक्टर मोटरसायकल अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. दिलीप यांचे वारस प्रयागबाई भगवान प्रधान (वय 70) यांच्या नावाने तीन लाखाचा धनादेश काढण्यात आला होता. श्री दत्त कारखाना व ऊस वाहतूक संघटना शिरोळ यांच्यावतीने हा धनादेश जया दिलीप प्रधान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, धनाजीराव जगदाळे, ऊस वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव माने - देशमुख, विद्यमान अध्यक्ष धनाजी पाटील - नरदेकर, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, मुसा डांगे, वाहतूक संघटनेचे सचिव उदय संकपाळ- शिलेदार, पपन जगदाळे, प्रशांत शेट्टी यांच्यासह दिलीप प्रधान यांचे नातेवाईक उपस्थित होते.