माहितीच्या अधिकार कायद्याखाली माहिती मागणाऱ्या पत्रकाराला धमकी

हाळ खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांची दादागिरी

पत्रकार खलील सुर्वे यांना ग्रामसेवकांसमोर धमकावले


प्रेस मीडिया लाईव्ह :

खालापूर (जि. रायगड) / प्रतिनिधी :- अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य महासचिव... पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा महासचिव...दै. वादळवारा, महानगर, रायगडनगरी, कोकण प्रजा, शिवसत्ता आदी माध्यमांचे प्रतिनिधी तथा पत्रकार खलील सुर्वे यांना आज हाळ खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच आजीम मांडलेकर यांनी हाळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयातच  ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यासमोर दादागिरीची भाषा करीत धमकावले. तसेच माहितीच्या अधिकार कायद्याखाली मागितलेल्या माहिती देण्यास मुदत न दिल्यास पाहून घेण्याची भाषा देखील केली. 


रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा नुकताच खून करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आज खालापूर तालुक्यात सुध्दा सत्तेची गुर्मी चढलेल्या उपसरपंचाने माहितीच्या अधिकार कायद्याखाली माहिती मागत असल्याबद्दल पत्रकाराला धमकावल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य महासचिव तथा पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा महासचिव पत्रकार खलील सुर्वे यांनी हाळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकार 2005 नुसार अर्ज केला आहे. या अर्जात सन 2015 पासूनच्या विकासकामांची व खर्च करण्यात आलेल्या निधीची माहिती मागविण्यात आली आहे. दरम्यान, सदर अर्जाबाबत चर्चा करण्यासाठी आज सोमवार दि. 13 रोजी ग्रामसेवक पोल मैडम यांनी फोन करून दुपारी 4 वाजता भेटण्यास बोलविले. त्यानुसार पत्रकार खलील सुर्वे कार्यालयात गेल्यानंतर ग्रामसेवक यांनी एक पत्र त्यांना दिले. या पत्रात माहिती देण्यास मुदतवाढ मागितली पण त्यात कोणतीही कालावधी देण्यात आलेली नसल्याने खलील सुर्वे यांनी माहिती देण्यास किती दिवस, किती वेळ लागेल हे द्या असे सांगितले. पण याच वेळी आलेले उपसरपंच आजीम मांडलेकर यांनी खलील सुर्वे यांना ऐकायचे आहे की नाही...वाद वाढवायचा आहे का? दादागिरीची भाषा करायची नाही...आज नाही, तर उद्या बसावेच लागेल...आम्ही नाही तर आमचे वरिष्ठ, नातेवाईक कुणी तरी मधी पडेलच, असे सांगत... महिला कार्ड खेळण्याचा ही प्रयत्न त्यांनी केला. त्याचप्रमाणे पाहून घेण्याची भाषा देखील उपसरपंच आजीम मांडलेकर यांनी केली. कामे करायची नाहीत... भ्रष्टाचार करायचा आणि अजून पत्रकार किंवा माहिती अधिकाराखाली माहिती मागितली म्हणून धमकावयचे, असा प्रकार सध्या रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात सुरू आहे. 

माहितीच्या अधिकार कायद्याखाली माहिती मागितली म्हणून धमकावणाऱ्या उपसरपंच आजीम मांडलेकर यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याखाली कार्रवाई करावी, अन्यथा मी दि. 16 फेब्रुवारी 2023 नंतर रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालसमोर आमरण उपोषणाला बसेल असा इशारा पत्रकार खलील सुर्वे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post