प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : तीनही पक्षांचे झेंडे, फटाक्यांचा दणदणाट, आसमंत भेडणाऱ्या घोषणा, दुचाकी घेऊन आलेल्या तरुण-तरुणींची लक्षणीय संख्या आणि मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात महाविकास आघाडीच्या भव्य रॅलीने आज पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आजचा (शुक्रवार) प्रचाराचा शेवटचा दिवस स्मरणीय ठरला. लोहियानगर पोलीस चौकीपासून सकाळी १०:३० वाजता रॅलीला प्रारंभ झाला. उमेदवार धंगेकर हे उघड्या जीपमध्ये बसून लोकांना अभिवादन करत असताना सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व दुकानदार यांचा प्रचंड प्रतिसाद सुरुवातीपासून लाभला.
आजच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर ‘रवींद्र धंगेकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा देण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिक पुष्पगुच्छ व शाल देऊन धंगेकर यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते.
घोरपडी पेठ पोलीस चौकीजवळ रॅली आल्यानंतर धंगेकर यांचे स्वागत करणारी भव्य रांगोळी काढण्यात आली होती. तेथून पुढे सिटी पोस्ट, हिराबाग चौक, एस.पी.कॉलेज, गांजवे चौक, दत्तवाडी म्हसोबा चौक, शनिवारवाडा, कामगार मैदान, साखळीपीर तालीम चौक, पांगुळ आळी आणि स्वामी समर्थ मठ येथे रॅली आल्यानंतर तिथे समाप्ती करण्यात आली.
या रॅलीमध्ये कॉंग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, अविनाश बागवे, बापू बहिरट, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, संदीप गायकवाड, विशाल धनवडे, ज्ञानेश्वर ठोंबरे, महेश पवार, निलेश गोरख, रुपेश पवार, चंदन साळुंखे, अनिल ठोंबरे, मनोज यादव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, युसूफ शेख, गोरख भिकुले, अजिंक्य पालकर, हर्शल भोसले, हेमंत येवलेकर आणि शांतीलाल मिसाळ या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
स्वामी समर्थ माठ येथे ‘धंगेकर जिंदाबाद’चा जोरदार नारा दिल्यानंतर या निवडणुकीतील ही शेवटची रॅली संपली.