हडपसर पोलीस ठाण्यात दुकानधारकावर कॉपीराईट अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : हडपसर सय्यदनगर या भागात नामांकित बाटा कंपनीच्या नावाने बनावट शूज, चप्पलची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. येथील बाटा शू स्टाईल, आर्यन सेंटर याठिकाणी छापा टाकून पोलिसांच्या पथकाने तब्बल 1 लाख 12 हजार रुपयांचे बनावट 75 नग जप्त केले. या बाबत हडपसर पोलीस ठाण्यात दुकानधारकावर कॉपीराईट अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान पांडुरंग कोळी (39, रा. सय्यदनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
बाटा कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सिंग देवरा (रा. पाली, राजस्थान) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा यूनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली. हडपसरमधील बाटा शु पॉईट येथील एका दुकानात बाटा कंपनीच्या नावे बनावट उत्पादने विकली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानूसार यूनिट पाचचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अंमलदार रमेश साबळे यांच्यासह पथकाने शूज विक्री सुरू असलेल्या दुकानावर छापा टाकला. यावेळी येथून तब्बल 1 लाख 12 हजार 425 रुपये किंमतीचे 75 नग जप्त केले आहेत. तर, विक्रेत्यावर कॉपीराईट अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.