प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : वाहतुकीचे नियमन करीत असताना सुनील पंढरीनाथ मोरे या पोलिस उपनिरीक्षक यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले , ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ सेनापती बापट जंक्शन येथे शुक्रवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास घडली. सुनील पंढरीनाथ मोरे (वय ५७, रा. शिवाजीनगर गावठाण, जोशी आळी, पुणे) असे त्यांचे नाव आहे.
ते चतु:शृंगी वाहतूक विभागात कार्यरत होते. ते शुक्रवारी सकाळी आठ वाजता ड्यूटीवर आले. सेनापती बापट जंक्शनजवळ चौकात वाहतूक नियमन करताना दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. तेव्हा त्यांच्यासोबत असलेले पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी त्यांना रिक्षामधून सेनापती बापट रस्ता येथील रत्ना मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुनील मोरे यांना नुकतीच खातेअंतर्गत पदोन्नती मिळाली होती.