एक लाख बालकांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पूर्ण.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 'जागरूक पालक सुदृढ बालक' अभियान मा.प्रा.डॉ.तानाजी सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार शुक्रवार, दिनांक ०९/०२/२०२३ रोजी सुरु झालेले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील अंदाजे २.९२ कोटी. ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 'जागरुक पालक सुदृढ बालक' अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील ६ लाख, ७९ हजार, ७६८ बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी बालवाड्या व सर्व शाळांमध्ये केली जात आहे. आठ आठवड्याच्या कालावधीत १२३ आरोग्य पथकाद्वारे एकूण १२३३ शाळा व ९६७ अगंणवाडीमध्ये ६,७९,९९३ बालके व किशोरवयीन मुले-मुली यांची प्राथमिक तपासणी होणार आहे. याच्या नियोजनाकरिता कृती दलाची बैठक मा.विक्रम कुमार, आयुक्त तथा प्रशासक, पुणे महानगरपालिका व मा.रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पुणे महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची समन्वय बैठक दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडली. सदर बैठकीस वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ५ परिमंडळा अंतर्गत, १५ क्षेत्रिय कार्यालयात एकूण १२३ आरोग्य तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली. सदर पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व अन्य कर्मचारी यांचा समावेश आहे. एका पथकाद्वारे दैनंदिनरित्या १५० मुलामुलींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिनांक २२/०२/२०२३ रोजी पर्यंत २६ अंगणवाडी / बालवाडी व २१९ शाळा यामध्ये ० ते ६ वयोगटातील ६८५८ बालके व ६ ते १८ वयोगटातील ९५२५६ मुला-मुलींची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून, सुमारे ५१७९ मुला-मुलींची ४ डी वर्गीकरणानुसार (Disease, Deficiency, Delay, Defects) वर्गवारी करण्यात आली आहे. पैकी २४८५ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले असून, २६८० विद्यार्थ्यांना विशेष शिबिरा मध्ये उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. विशेष शिबिरा करिता परिमंडळ स्तरावरून पुणे महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहांमधून दर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेषज्ञांकडून तपासणी होणार आहे. सदर ठिकाणी तपासण्या व औषधोपचार मोफत केले जाणार आहेत.
विशेषज्ञांच्या तपासणी दरम्यान शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या बालकांना जिल्हा सामान्य रुग्णालय, औंध येथे मोफत शस्त्रक्रिया शालेय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत केल्या जाणार आहेत. आवश्यकता असल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत संलग्न खाजगी रुग्णालयांमध्ये योजनेच्या नियम व अटीनुसार मोफतश स्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. मा.मुख्यमंत्री महोदय ना.एकनाथजी शिंदे आणि मा.आरोग्य मंत्री महोदय ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी सदर अभियाना अंतर्गत अधिकाधिक पालकांनी आपल्या पाल्याची सर्वंकष तपासणी करून घेण्याचे आवाहन केले असून सर्व शासकीय, खाजगी, केंद्रीय व समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी आरोग्य पथकास सहकार्य करणेविषयी सूचित केले आहे.