मात्र भाजपनं जाहीर केलं नगरसेवक हेमंत रासने यांचं नाव .




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूका लागल्या आणि शर्यत रंगली ती उमेदवारी कुणाला जाहीर होणार याची. कसबा पेठ हा तर भाजपचा बालेकिल्ला. १९९५ पासून सलग ५ टर्म गिरीश बापट या मतदारसंघाचे आमदार होते, त्यांची खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर माजी महापौर मुक्ता टिळक कसब्याच्या आमदार झाल्या, तेही जवळपास २८ हजारांचं मताधिक्य घेऊन.पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, मात्र भाजपनं नाव जाहीर केलं नगरसेवक हेमंत रासने यांचं.टिळक कुटुंबातली दोन नावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अशी ओळख असणारे धीरज घाटे यांना पिछाडीवर टाकत उमेदवारीची माळ रासने यांच्या गळ्यात पडलीये आणि साहजिकच चर्चा सुरु झालीये ती रासने यांच्या राजकीय ताकदीची.२००२ मध्ये रासने पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकांमध्येही त्यांनी यश मिळवलं. त्यांच्या प्रभागातला शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ हे भाग आहेत. जुने वाडे, ट्रॅफिकची समस्या आणि पाणीपुरवठा या स्थानिक प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेमुळे रासने कायम चर्चेत राहीले.मात्र त्यांनी आपला होल्ड प्रस्थापित केला, तो पुण्याच्या महानगरपालिकेवर. महानगर पालिकेची आर्थिक तिजोरी म्हणजेच स्थायी समिती. २०१९ मध्ये रासने पहिल्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पुणे महानगर पालिकेत कुठल्याच नगरसेवकाला स्थायी समितीच्या अध्यक्षपदी दोनदा संधी मिळाली नव्हती, मात्र हेमंत रासने यांनी सलग चार टर्म स्थायी समितीचं अध्यक्ष भूषवलं.

सत्ताधारी भाजपकडून अनेक जण इच्छुक असले, तरी स्थायी समितीवर आणि पर्यायानं पुणे महानगरपालिकेवर त्यांचा होल्ड कायम राहिला.विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट कसबा पेठेचे माजी आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचा प्रभाग कसबा पेठ मतदार संघात येतो, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांचाही प्रभाग कसबा मतदारसंघात आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून संधी मिळालेल्या हेमंत रासने यांचाही. एवढी सगळी ताकद भाजप एकाच मतदारसंघात लावत असल्यानं पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चा होऊ लागल्या, त्यातून इतरांचे पत्ते कट झाले मात्र हेमंत रासने यांचं पद पक्षाच्या हायकमांडकडून कायम ठेवण्यात आलं.स्थानिक राजकारणातही हेमंत रासने यांचा दबदबा आहे, याचं कारण म्हणजे त्यांचा प्रभाग येतो शनिवार आणि सदाशिव पेठेत. या दोन्ही पेठामध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अधिक आहे, जे भाजपचे पारंपारिक मतदारही आहेत. पूर्ण कसबा पेठ मतदारसंघाचंच बोलायचं झालं, तर इथंही ब्राह्मण टक्का आणि भाजपचे पारंपारिक मतदार मोठ्या संख्येनं आहेत, ज्याचा रासनेंना साहजिकच फायदा होऊ शकतो.



Post a Comment

Previous Post Next Post