पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 'जागरुक पालक सुदृढ बालक' अभियान ९ फेब्रुवारी २०२३ पासून



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  :  महानगरपालिका कार्यक्षेत्रात 'जागरुक पालक सुदृढ बालक' अभियान ९ फेब्रुवारी २०२३ पासून राबविले जाणार आहे. ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी या अभियान अंतर्गंत होणार आहे. मा. मुख्यमंत्री महोदय आणि मा. आरोग्य मंत्री महोदय यांनी सदर अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पुणे महानगरपालिका यांच्या दालनामध्ये आज दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), श्री.रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षते खाली पुणे महानगरपालिका शहर कृती दलाची (सिटी टास्क फोर्सची) बैठक झाली. 

हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), बालविकास प्रकल्प (नागरी), समाज विकास विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन व इंडियन पेडियाट्रिक्स असोसिएशन या सर्व घटकांचा सक्रीय सहभाग असण्याची सूचना मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी केली. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी अभियानाची व्याप्ती, अंमलबजावणीबाबत माहिती दिली. शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, खासगी शाळा, आश्रमशाळा, अंधशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खाजगी नर्सरी, बालवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथ आश्रम, समाजकल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे या ठिकाणी तसेच शाळा बाह्य मुले-मुली यांचीही तपासणी होणार आहे. जन्मजात दोष, कमतरता, आजार, विकासात्मक विलंब असे तपासणीचे निर्देशांक असणार आहेत. यावेळी नोडल अधिकारी श्री. राजेश दिघे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक श्री. विनोद जाधव व शहर लेखा व्यवस्थापक श्री. अक्षय कुळकर्णी उपस्थित होते.

बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य तपासणी बरोबरच आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरीत उपचार जिल्हा सामान्य रुग्णालय, औंध येथे तसेच आवश्यकता असेल तर महात्मा फुले जन योजने अंतर्गत उपलब्ध सेवा पुरविला जाणार आहे. सुरक्षित आणि सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले जाणार आहे. आठ आठवड्याच्या कालावधीत १२३ आरोग्य पथकाद्वारे एकूण १२३३ शाळा व ९६७ अगंणवाडीमध्ये ६,७९,९९३ बालके व किशोरवयीन मुले-मुली यांची प्राथमिक तपासणी होणार आहे. तपासणी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आर.बी.एस. के पथक, आशा आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश असणार आहे. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार व संदर्भ सेवा दिली जाणार आहे. सर्व शासकीय व खाजगी शाळांतील मुख्याध्यापक यांनी आरोग्य पथकास सहकार्य करण्याचे आवाहन मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पुणे महानगरपालिका श्री. रविंद्र बिनवडे यांच्याकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post