प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगनं पुणे शहरात हैदोस घातलेला दिसतोय. दररोज या कोयता गँगकडून धमकी, मारहाण असे प्रकार सातत्यानं होत आहेत. या कोयता गँगची मजल थेट स्वताचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यापर्यंत गेली आहे.कोयता गँगच्या दहशतीचा फायदा घेत अनेक गुन्हेगार या गंगच्या नावाखाली सर्रास गुन्हे करतानाचे प्रकार ही वाढली आहेत
या सगळ्या प्रकारांनंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असातनाच, आता पुणे पोलिसांनी या गँगला गडाआड करण्याचा विडा उचललेला दिसतोय. पुण्यात 100 हून अधिक नामांकित आणि सराईत गु्न्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. इतकंच काय तर या गुंडांना पकडून देणाऱ्या पोलिसांना बक्षीस देण्याचा निर्णयही पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी घेतला आहे.
पुणे पोलिसांनी जर या कोयता गँगला पकडून दिलं तर मोठं बक्षीस देण्याची घोषणा पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी केलीय. कोयता शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली तर 3 हजार ते 10 हजारांपर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. फरार आरोपी पकडला तर 10 हजार बक्षीस पुणे पोलिसांना देण्यात येणार आहे. मोक्काच्या गुन्हेगाराला अटक केली तर त्या पोलिासला 5 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. आता या बक्षींसासाठी तरी पुणे पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा पुणेकरांना आहे.
पुणे शहराचा विकास होत असताना, शहरातील गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचं दिसतंय. गेल्या काही काळांपासून गँग, टोळ्यांचा बोलबाला पुणे शहर आणि परिसरात आहे. एकमेकांशी असलेल्या गँगवॉरच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी खुलेाम गुन्हे करण्यापर्यंतची मजल या गुन्हेगारांची पोहचलेली. कायदा-सुव्यवस्थेचे धडे सामान्य माणसाला देणारे पोलीस आणि राज्यकर्ते हे रोखण्यात थेट अपयशी असल्याचं जाणवतंय. आता या बक्षीस योजनेची घोषणा करावी लागणे, हेच खरंतर पुणे पोलिसांचं अपयश म्हणावं लागेल. आता तरी शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त होणार का, असा प्रश्न विचारण्यात येतोय.