प्रेस मीडिया लाईव्ह :
नेज ता. २५ भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे कालातीत व्यक्तिमत्व असून ते नेहमीच संदर्भपूर्ण राहतील.ईश्वर सत्य आहे पासून सत्य ही ईश्वर है पर्यंतचा त्यांचा प्रवास हा एका दृष्ट्या,तत्त्वनिष्ठ, प्रगल्भ,यूगकर्त्याचा प्रवास आहे. सत्यापासून अहिंसेपर्यंतची त्यांची विचारधारा ही मानव जातीला कायमच प्रेरक व दिशादर्शक ठरणारी आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते श्री अण्णासाहेब डांगे कला- वाणिज्य -विज्ञान महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात 'गांधी विचारांची आजची गरज ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी नेज हायस्कूलचे मुख्याध्यापक गजानन खोत होते. मंचावर प्रा. डॉ.सुनिता तेलसिंगे व प्रा. डॉक्टर संघमित्रा सरवदे उपस्थित होत्या. स्वागत प्रथमेश कुदळे यांनी केले.प्रास्ताविक विलास सावंत तर पाहुण्यांची ओळख अनिकेत शिंदे यांनी करून दिली. मीरा चाळके या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रोपट्याला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, गांधीजींनी गांधीवाद म्हणून स्वतः कोणताही इझम लिहून ठेवला नाही. पण त्यांच्या कार्यातून गांधी मार्गाचे सारसूत्र आपल्याला कळू शकते. अन्यायाचा सतत प्रतिकार केला पाहिजे. हा प्रतिकार अहिंसक मार्गाने केला पाहिजे .उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी शुद्ध साधने वापरली पाहिजेत. शारीरिक श्रमांची प्रतिष्ठा समाजात मान्य झाली पाहिजे. व्यक्ती आणि समाज निर्भय असला पाहिजे. उत्पादन व्यवस्था व राज्यव्यवस्था विकेंद्रित असली पाहिजे. कोणत्याही विषमतेला अथवा भेदभावाला थारा देता कामा नये. नीती हे सर्व धर्माचे सार असून नीतीचे पालन केले पाहिजे. सत्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. निसर्ग आणि मानव यांच्यात संतुलन राखले पाहिजे हे गांधी विचारे सार सूत्र मानवजातीला नेहमीच उपयोगी ठरणार आहे. आपण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे हे अतिशय गरजेचे आहे. जर त्याचा आपण स्वीकार केला तर आणखी पंचवीस वर्षांनी म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळी हा देश सर्वार्थाने अधिक विकसित झालेला असेल. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात गांधीजींचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि विचार व त्याचे महत्व यांची मांडणी केली तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंकांचे निरसनही केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गजानन कोले म्हणाले, आजच्या काळामध्ये गांधी विचारांची अपरिहार्यता अनेक पटींनी वाढली आहे. गांधींची सत्यनिष्ठा,अहिंसा तत्वज्ञान यासह इतर व्रते आज अतिशय महत्त्वाची आहेत. त्याचे पालन विद्यार्थी विद्यार्थिनींनी करण्याची गरज आहे. करण गुप्ता यांनी आभार मानले स्वरांजली पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.