प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : पती दीपक येवले यांनी चारित्र्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची घटना बालिंगा येथील नदी पुलाजवळ आज (दि.७) सकाळी घडली. स्नेहल दीपक ऐवळे (वय 24, रा.खडकी, ता. मंगळवेढा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या बाबत पती दीपक येवले याने स्वतः करवीर पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबूली दिली आहे.
येवले दाम्पत्य ऊस तोडणी कामगार आहेत. मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथून ऊसतोड कामगार टोळी समवेत पती-पत्नी काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील कारदगा येथे आले आहेत. दीपक हा नेहमी स्नेहलच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून दोघात वादावादी होत होती. दोन दिवसापूर्वी हे दोघेजण बालिंगा परिसरात आले होते. नागदेववाडी कचरा डेपो जवळ असलेल्या शेतात त्यांचा मुक्काम राहिला होता. आज पहाटे चार वाजता चारित्र्याच्या संशयातून दोघात पुन्हा वादावादी झाली. त्यानंतर पत्नी झोपी गेली. संशयातून संतापलेल्या पतीने मोठा दगड घेऊन पत्नीचे डोके ठेचले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयीत सकाळी सात वाजता करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे करवीर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.