प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : साडेतीन शक्तीपिठापैकी एका आध्यात्मिक आणि जागरूक महालक्ष्मीच्या नगरीतील एक कर्तव्यदक्ष, कर्तबगार माजी महापौर मा. ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे साहेब यांनी आपल्या वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण करून शंभरीकडे प्रयाण केले आहे तसेच त्यांच्या वकिली व्यवसायसही पन्नास वर्षे पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवात पदार्पण ही बाब त्यांच्या कुटुंबियांबरोबरच आम्हा मित्र परिवारालाही आनंदाची, आधाराची आणि हवीहवीशी आहे. ईश्वर ज्यांना नात्यात गुंफायला विसरतो, त्यांना तो 'मित्र' म्हणून माणसाच्या आयुष्यात पाठवतो.
अशी हिन्या-मोत्यासारखी माणसं आडगुळेसाहेबांच्या आयुष्यात आली. साहेबांनी त्यांना आकार दिला व हा मौल्यवान ठेवा त्यांनी प्राणापार जपला. 'माणूसपण जपणारा माणूसच त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो. म्हणून मा. आडगुळेसाहेबांच्या जीवनात कोल्हापूर महानगरपालिकेचे सन्मानाचे स्थायी समिती सभापती पद, सर्वोच्च मानाचे महापौर पद, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद, कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्षपद, कोल्हापूर तालीम संघाचे कार्याध्यक्षपद आदी अनेक पदे स्पर्श करून धन्य झाली. एखादा माणूस आपल्या स्पर्शाने आणि कर्तबगारीने पदानाही गौरवान्वित करतो हे त्यांच्याकडे बघून कळते. एकदा मित्र मानला की त्याच्यासाठी काहीही करण्याची तयारी आपल्या ला सचोटीने न्याय मिळवून देण्याची पराकाष्ठा, मतदात्यांना अन्न, पाणी, निवारा आणि आरोग्य अशा सुविधा देण्यासाठी दाखवलेली कर्तव्य कठोरता व एक माणूस म्हणून मायेच्या ओलाव्याने जपलेली आर्द्रता देण्या ते कुठेही, कधीही कमी पडत नाहीत. मा. आडगुळेसाहेबांचे हे बहुविध गुण व वैशिष्ट्ये या अंकातील सर्वच लेखकांनी आपल्या परीने समर्पक पद्धतीने रेखाटली आहेत. साहेबांच्या आयुष्यातील कॅमेऱ्यात कैद झालेली दुर्मिळ छायाचित्रे त्यांच्या कुटुंबियांनी योग्य वेळी दिल्यामुळे सदरचा अंक, देखणा व सुरेख होण्यास अधिक मदत झाली. गौरव ग्रंथ सुंदरपणे टंकलिखित करणाऱ्या श्री. नारायण हारुगडे, तो काटेकोरपणे व बारकाईने तपासणारे प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. डॉ. सुमित्रा पोवार आणि कोऱ्या कागदावर आकारास आणणाऱ्या मा. श्री. राजकुमार पाटील (दे. सत्यवादी) या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सदर गौरव ग्रंथाचे नाव 'प्रेरणा' असे मुदामच ठेवले आहे. मा. आडगुळे साहेबांच्या आदर्श जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन भविष्यातही अशी प्रेरणादायी नेतृत्व उदयास यावीत म्हणून हा ग्रंथ वाचकांना नक्कीच मार्गदर्शन करेल.