प्रेस मीडिया लाईव्ह :
कराड - पुणे -बंगळुरू आशियाई महामार्गावरील सातारा ते कागल महामार्ग सहापदरीकरण कामांतर्गंत कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील बहुचर्चित उड्डाणपूल पाडण्यास बुधवार सुरुवात करण्यात आली. कराड व मलकापूर येथील दोन्ही उड्डाणपूल पाडून शहरातील महामार्गालगत असलेल्या पंकज हॉटेलपासून ते नांदलापूरपर्यंत नवा सहापदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पंकज हॉटेलच्या बाजूकडून पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदरचे काम डीपी जैन कंपनीला देण्यात आले असून या कंपनीचे प्रोजक्टचे प्रमुख इंजिनिअर सत्येंद्रकुमार वर्मा यांच्या हस्ते उड्डाणपूल पाडण्याचा आरंभ करण्यात आला.
यावेळी कंपनीचे अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, पूल पडण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर नाका येथील उड्डाण पुलावरील सातारा बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. ही वाहतूक हॉटेल पंकजसमोर केलेल्या वळण मार्गातून महामार्गाच्या लेनवर वळवण्यात आली आहे. ही वाहतूक पुढे कोल्हापूरच्या दिशेने जात असताना खरेदी-विक्री पेट्रोल पंपासमोर केलेल्या वळण मार्गातून पुन्हा डाव्या बाजूला येऊन हायवेवरील मुख्य लेनवरून कोल्हापूर बाजूकडे जात आहे.