खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी साताप्पा गुंडू बागडी तर व्हाईस चेअरमनपदी दादासो खुबाण्णा देवताळे यांची बिनविरोध निवड


प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर/प्रतिनिधी:

 येथील डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी साताप्पा गुंडू बागडी (कुरुंदवाड) तर व्हाईस चेअरमनपदी दादासो खुबाण्णा देवताळे (गणेशवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करिता संघाच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली.

या सभेत चेअरमन पदासाठी साताप्पा बागडी यांचे नाव संचालक शामराव पाटील यांनी सुचविले. त्यास संचालक उदयसिंह जगदाळे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी दादासो देवताळे यांचे नाव संघाचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी सुचविले. त्यास संचालक राजाराम रावण यांनी अनुमोदन दिले.

चेअरमन पदासाठी साताप्पा बागडी व व्हाईस चेअरमन पदासाठी दादासो देवताळे यांचे एकमेव नाव आल्याने दोन्ही पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आल्या.

नूतन चेअरमन साताप्पा बागडी व  व्हाईस चेअरमन दादासो देवताळे यांचा उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी संघाच्या प्रगतीबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थैर्यता उंचावण्याकरिता विविध योजना राबवून संघाबरोबरच शेतकरी आर्थिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

चेअरमन साताप्पा बागडी व व्हाईस चेअरमन दादासो देवताळे यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शी कारभार करत शेतकरी सभासदांचे हित साधून संघाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी संघाचे संचालक सुरगोंडा पाटील, रावसो चौगुले, मोहन ढवळे, सुनील पाटील, गजानन करे, रघुनाथ म्हेत्रे, सज्जनसिंग रजपूत, महेश कांबळे, अशोक धनगर, सौ. अर्चना धनवडे, सौ. सुरय्याबेगम जमादार व संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सातगोंडा गौराज यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post