प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
वर्ध्याच्या महात्मा गांधी साहित्य नगरीतील आचार्य विनोबा भावे मंडपामध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते. तर वर्ध्यामध्येच कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरीमध्ये १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक चंद्रकांत वानखेडे होते. न्यायमूर्ती चपळगावकर यांनी राज्य शासनाने साहित्य संमेलने आयोजित करण्याच्या भानगडीत पडू नये.ही शासनाची मक्तेदारी नाही. शासन केंद्र हे कायम निसरडे असते .आणि सरकारी साहित्य संमेलने ही यथावकाश साहित्याचे सरकारीकरण ठरू शकतात .त्यामुळे संमेलन आयोजित करण्याचे काम साहित्यातील स्वायत्त संस्थांचे आहे. आणि ती जबाबदारी हिरावून घेऊ नये.या भूमिकेसह आपल्या भाषणामध्ये हैदराबाद संस्थानातील निजामाची राजवट, विचार करता येणे आणि तो व्यक्त करणे ,लेखकाचे स्वातंत्र्य, तत्त्वज्ञ इसाया बर्लिनची अभावात्मक स्वातंत्र्य आणि भावात्मक स्वातंत्र्याची संकल्पना, आचार्य भागवतांनी मर्ढेकरांच्या निमित्ताने सर्व लेखकांना दिलेला सल्ला, महाराष्ट्रातील सर्व सामाजिक राजकीय विचारवंत, मराठी साहित्य निर्मिती,वाढती असहिष्णुता ,बदलते सामाजिक सांस्कृतिक वास्तव, प्रबोधनाची परंपरा ,नवे आर्थिक धोरण ,केवळ समीक्षेला वाहिलेले नियतकालीक हवे, ग्रंथालय आणि ग्रंथ व्यवहार, शासन आणि साहित्य व्यवहार, मराठी भाषा, देशाचे ऐक्य आणि प्रादेशिक भाषा, छोटी छोटी साहित्य संमेलने व त्यांचे महत्व अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. न्या. चपळगावकर यांचे या भाषणातील ' या संमेलनाच्या निमित्ताने आज कमी होत चाललेल्या वैचारिक लेखनाबद्दल मराठी भाषा आणि वांग्मय यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल आपल्याशी बोलावे असे मी योजले आहे.' हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे.
चंद्रकांत वानखेडे विद्रोहीच्या अध्यक्षपदावरून म्हणाले ,या देशात कधी कपडे, कधी टिकली यावरून वाद उकरून काढला जातो. हिंदुत्व धोक्यात येत आहे असा कांगावा केला जातो. लव जिहाद, हनुमान चालीसाला हिंदुत्वाची झणझणीत फोडणी दिली जाते. हिंदूंची घटती व मुस्लिमांची वाढती लोकसंख्या असे भय पसरवून हिंदूंना भयभीत करून सोडले जाते. हा हिंदुत्वाचा खेळ फक्त सत्तेसाठी सुरू आहे. हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात आम्ही गल्लीत केली.पोषणापेक्षा भयापोटी संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा बनवण्याच्या धोरणाचा अवलंब आज केला जात आहे. धर्म हेच यांच्या शोषणाचे हत्यार आहे. हे तुम्ही आम्ही समजून घेण्याची वेळ आलेली आहे. अलीकडे आपण पोषणाचे मुद्दे विसरून गेलो आहोत बेरोजगारीचा प्रश्न अजेंड्यावर नाही आता महागाई लोकांना छळत नाही. पेट्रोल, डिझेल ,गॅसच्या भावांमधील वाढ लोकांना त्रास देत नाही.सरकारची कसाबनीती शेतकऱ्यांसाठी घातक आहे. देशात देशाचे संघाणू आणि विषाणू तयार केले आहेत आपण सारे प्रेम करूया प्रेम करणे हाच आमचा विद्रोह आहे क्रांतीतून करुणा वजा केली तर क्रौर्या शिवाय काही शिल्लक राहत नाही.'इतरही अनेक मुद्दे थेटपणे चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले. एकूणच या दोन्ही संमेलनात झालेले परिसंवाद, त्यात झालेली चर्चा व अग्रक्रमाने मांडलेले मुद्दे, त्यांना मिळालेला प्रतिसाद या सर्व गोष्टी माध्यमातुन पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही.
या निमित्ताने आपण साहित्य ,समाज आणि शासन यांच्या परस्पर नातेसंबंधाची चर्चा करणे आणि ते समजून घेणे आवश्यक आहे.साहित्य हे सहीत नेणारे असते. वैश्विक असते. जात-पात भाषा प्रांत अशी कोणतीही सीमा साहित्याला नसते. कारण ते माणसाची माणूस म्हणून ओळख प्रस्थापित करत मानवतेची प्रस्थापना करणारे असते. मात्र सध्या संकुचित विचारधारेच्या माणसांना सत्ताबळ प्राप्त झाले आहे .त्यामुळे साहित्यसह माणसांचीही फाळणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला पद्धतशीर ,सूत्रबद्ध पद्धतीने गुंफले जात आहे.याकडे वेळीच गांभीर्याने पाहिले नाही तर सार्वत्रिक कंगालीकरणाचा मोठा धोका आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक ठरवण्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणे चांगल्या बाबीचे द्योतक नाही. साहित्य क्षेत्रातील असा हस्तक्षेप ही सांस्कृतीक पोखरणाची प्रक्रिया असते.
अस्वस्थ वातावरणाची श्वास गुदमरल्याची जाणीव काही जणांना होत नसते. कारण त्यांचा राजकीय व मानसिक प्राणवायू वेगळा असतो. स्वार्थी असतो.त्यामुळे कोणाला' देशात हिटलर शाही नाही ' तर कोणाला 'आज लोकशाही आहे पण उद्याचे माहीत नाही' असे सावध बोलावे लागते. पण लहान ,मोठ्या संमेलनात, परिसंवादात सहभागी असलेल्यानी सध्या चाललंय ते बरं चाललं नाही आणि त्याला विरोध केलाच पाहिजे असं मत व्यक्त करणे फार गरजेचं आहे.
पुरस्कार वापसिला ,नियुक्तीपत्र परतीला, राजीनाम्याला कुच्छितपणे हीणवणाऱ्या तसेच वाढत्या असहिष्णुतेबाबत पत्र लिहिणाऱ्या विचारवंत ,कलावंत ,साहित्यिकांना धमकावण्याचा प्रयत्न अलीकडे वाढत चालला आहे. पण अशा असंस्कृतिक वर्तन व्यवहाराविरुद्ध वैचारिक विरोध वाढतो आहे हेही खरे आहे. कारण लोकांना उज्वल पहाटेचे स्वप्न दाखवून गर्द काळोखात फार काळ ठेवता येत नाही. हा मानवी इतिहास आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा सर्व क्षेत्रात अपेक्षाभंगाचा प्रवास धोरणकर्त्याना फार काळ करता येत नाही. त्यावर निखळ माणुसकी आणि सर्वांगीण समतेवर आधारित धोरण आखणे आणि अमलात आणणे हाच एकमेव उपाय असतो.
साहित्य आणि समाज प्रबोधन यांचे नाते फार जवळचे आहे. समाज परिवर्तनाची चळवळ गतिशील करण्यात साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असते.प्रबोधनासाठी जी सैद्धांतिक भूमिका असते ती साहित्याच्या विविध प्रकारातून समाजापुढे येणे आवश्यक असते. अर्थात केवळ प्रबोधन, परिवर्तनाच्या ध्यासातून साहित्याची निर्मिती केली तर ती सकस निर्मिती होईलच असे नाही. त्याला एक प्रकारचा प्रचारकी थाट ,कृत्रिमता आणि पर्यायाने निर्जीवता येण्याची ही शक्यता असते. त्यासाठी समाज जीवनात जी स्पंदने निर्माण होतात, जी हालचाल होत असते, जी ढवळाढवळ होत असते त्यापासून प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन जे साहित्य निर्माण होते ते जीवनातील परिवर्तनाचे व सामर्थ्याचे भान आणून देत असते.
साहित्यात समाजाला बरोबर घेत समाजाला पुढे नेण्याची मोठी ताकद असते.सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचे दर्शन त्यातून होत असते.कुसुमाग्रज म्हणायचे की, 'साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी शक्ती आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो. या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करत असते. माणसे मरत असतात पण त्यांनी उच्चारलेला वांग्मयीन शब्द मात्र अजरामर असतो.'
साहित्य हे माणसावर कोणते ना कोणते संस्कार करत असते. साहित्य हे नेहमी जीवनातील विविधतेचा , व्यामिश्रतेचा आणि गतिशीलतेचा शोध घेत असते. अर्थात हे सारे अभिव्यक्ती स्वातंत्र मुक्त असेल तर शक्य होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे घटनादत्त आहे. आपले विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करणे हे स्वातंत्र्य नैसर्गिकही आहे.माणूस ,प्राणी आणि वनस्पतीही अभिव्यक्ती जोपासतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे .भारतीय संस्कृती व तत्वज्ञानांमध्येही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि लोकशाही मूल्य अभिप्रेत आहे.आपल्याला न पटणारे विचार ऐकून घेण्याचा समंजसपणा व विवेकवादही त्यात गृहीत आहे. पण आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच जोरदार हल्ले होत आहेत.या हल्लेखोरांचे विवेकवादाशी वाकडे असते. त्यामुळे वैचारिक विरोधकांचे खून करणे, भ्याड हल्ले करणे, खोटी बदनामी करणे, गप्प बसायला भाग पडणे, भीती दाखवणे, बदनामी करणे असे प्रकार घडत असतात ते अत्यंत चुकीचे आहेत.
साहित्य संमेलनाच्या मंचावरून जातीयवाद ,धर्मांधता ,दहशतवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,आविष्कार स्वातंत्र्य ,बेरोजगारी, महागाई, शेतीचे व उद्योगधंद्यांचे प्रश्न, ग्रामीण व शहरी प्रश्न सार्वत्रिक बकालीकरण असे विविध विषयांच्या आणि महत्त्वाचे असते. कवी संमेलनातून ती वैविध्यता येत असते. साहित्य आणि समाज यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी अशा मोठ्या संमेलनात तीन दिवसात किमान दोन परिसंवादात देशापुढील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर झाले पाहिजेत असे वाटते. ज्यावेळी ते होईल त्यावेळी साहित्य आणि समाज यांचे नाते अधिक जवळचे होईल यात शंका नाही.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतिस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.