सातबारा उताऱ्याशी आधार लिंक करण्याची योजना राज्यात राबविण्याचा भूमि अभिलेख विभागाचा मानस
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जमिनीच्या सातबारा उताऱ्याशी खातेदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक लिंक करण्याची योजना भूमि अभिलेख विभागाने आणली आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर राज्यातील सहा महसूल विभागातील एक गाव याप्रमाणे सहा गावांची निवड केली आहे. सद्यस्थितीत सातबाऱ्याशी आधारक्रमांक लिंक करण्यासाठी कोणती कार्यप्रणाली वापरावी, याबाबतचे काम सुरू आहे. ही कार्यप्रणाली निश्चित झाल्यानंतर सातबारा उताऱ्याशी आधार लिंक करण्याची योजना राज्यात राबविण्याचा भूमि अभिलेख विभागाचा मानस आहे.
पॅन कार्ड, बॅंक खाते, मोबाइल क्रमांक, गॅस कनेक्शन आदींसाठी आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताबारा उताऱ्यावर आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
ओटीपी-बायोमेट्रिकने लिंक करण्याची सुविधा
सातबारा उताऱ्याशी आधार लिंक करण्यासाठी मोबाइल द्वारे ओटीपी नंबर टाकून आधार लिंक अथवा बायोमेट्रिक पध्दतीन बोटांचे ठसे घेऊन सातबारा उताऱ्याशी आधार लिंक करणे, या दोन पध्दतीं पैकी कोणत्या पध्दतीचा अवलंब करून सातबारा उताऱ्याशी याबाबत तांत्रिक बाजूची तपासणी करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मालकी हक्काची खात्री शक्य
बनावट सातबारा उतारा अथवा जमिनी मालकांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती उभी करून जमिनीची खरेदी विक्रीचे प्रकार घडतात. त्यातून मोठे न्यायालयीन वाद निर्माण होत असून, दाव्यांची संख्याही वाढत आहे. त्यास आळा बसावा, जमीनमालकांची तसेच खरेदीदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी उताऱ्यावर आधार क्रमांक लिंक निर्णय घेण्यात आला आहे. दस्त नोंदणी कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टिम पूर्वीपासूनच आहे. सातबाऱ्यावर आधार नंबर दिल्यास दस्त नोंदणीच्या वेळी नोंदणी निरीक्षकांना मालकी हक्काची खात्री करून घेणे सोयीचे होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सातबारा उताऱ्याशी आधार क्रमांक लिंक करणे ऐच्छिक
सातबारा उताऱ्याशी आधार लिंक करण्यासाठी पहिल्यांदा आधारकार्डशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक
आधार क्रमांक गोपनिय राहणार असून सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक दिसणार नाही