पोलिसांनी आकाश शिवाजी हवीनाळ आणि प्रेम सुंदर तुपसौंदर्य यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला
प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : पोलिसांनी आकाश शिवाजी हवीनाळ आणि प्रेम सुंदर तुपसौंदर्य (दोघे रा. इंदिरा नगर, जत) यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप यातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नव्हती. पोलिसांनी व पीडित मुलीच्या पालकांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सायंकाळी 6 वाजता ती व तिचा लहान भाऊ इंदिरा नगर रोडवरून राजे रामराव उच्च महाविद्यालय येथे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी निघाले होते.
युवतीची छेडखानी :
वरील संशयित आरोपींनी पीडित मुलीला निजर्नस्थळी गाठत तिला अश्लील शब्द प्रयोग करत तिचा पाठलाग केला. मुलीने प्रत्युत्तर देताना तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली. तिला छेडछाड करताना तिचा लहान भाऊ मध्ये आला. त्या दोघांनी त्यालाही मारहाण केली. मारहाण होत असताना पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
परिसरात खळबळ :
परिसरातील लोक जमा होताना दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. पीडित मुलीने ही घटना घरच्यांना सांगितली. नंतर घरच्यांनी जत पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. भर दिवसा ही घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. याचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
सांगलीतील गुन्हेगारी थांबेना :
सांगली शहरामध्ये 23 डिसेंबर, 2022 रोजी एका घरावर धाडसी दरोडा पडला होता. शहरातल्या कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथे पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला होता. पाच ते सहा दरोडेखोरांनी बंगल्यामध्ये घुसून घरातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर हात-पाय बांधून घरातील सव्वा आठ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला होता.दागिने हिसकावून पोबारा : पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, रोडवरील दत्तनगर आशीष चिंचवाडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्व जण झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागील दरवाज्याने प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत घरातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही जणांचे हातपाय बांधले आणि चिंचवड यांच्या आईच्या गळ्यात असणारे सव्वा आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर घरातल्या कपाटात असणारे चांदीचे आणि सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड, असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.
तीन पथके रवाना:
या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरीचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे. दरम्यान सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन दरोड्याची माहिती घेत गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याचे माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.