प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर कसबा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक लावण्यात आलेली आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार आज पासून पुणे शहर पोलिसांनी समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक आणि दत्तवाडी या पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कलम १४४ लागू केले आहे. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याकरिता सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश काढले आहेत.
या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र घेऊन फिरण्यास या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी, पोलीस दल, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा विभागाचे तसेच अन्य केंद्रीय तसेच राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना शस्त्र न बाळगण्याच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.